महान्यूज नेट भेट
महान्यूज नेट भेट
दोन कोटी वृक्ष लागवडीसाठी धुळे जिल्हा प्रशासन सज्ज : अण्णासाहेब मिसाळ गुरुवार, ३० जून, २०१६
महाराष्ट्र शासन पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवित आहे. ही मोहिम अर्थातच ‘हरीत महाराष्ट्र’ संकल्पनेशिवाय अपूर्ण राहील. या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन सध्याच्या २० टक्यांवरून ३३ टक्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या 1 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या कृषी दिन व वन महोत्सवाचे औचित्य साधून राज्यभर दोन कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. या निमित्ताने धुळे जिल्ह्यातील तयारी बाबत जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी झालेली ही नेट भेट...

1) प्रश्न :- दोन कोटी वृक्षलागवड का ?
उत्तर :- औद्योगिकीकरण, नागरिकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंग व वातावरणातील अनैसर्गिक बदल अशा परिस्थितीला वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलाचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मराठवाड्यासारख्या मोठ्या भूभागाला तीव्र जलसंकटाची उद्भवलेली समस्या होय. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक तीव्रतेच्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर मात करण्याकरिता व पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याबाबत सोशल मीडियावर एक बोलके व्यंगचित्र फिरत आहे. त्यात जेथे वृक्ष आहेत, तेथे पाऊस पडत आहे, तर जेथे वृक्ष नाहीत, तेथे ढग म्हणतोय, की माझा मित्र (वृक्ष) नाही, तर मी येवू कसा?. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करणे आवश्यकच नाही, तर अत्यावश्यक झाले आहे. केवळ वृक्षारोपण करुन उपयोग नाही, तर त्यांचे संगोपन, संवर्धनासाठी लोक सहभागाची आवश्यकता आहे. लोकसहभागाशिवाय वृक्षारोपणाची चळवळ अशक्य आहे. तसेच राज्यातील 33 टक्के भूभाग वृक्षाच्छादनाखाली आणणे आवश्यक असून 1 जुलै 2016 रोजी या एकाच दिवशी 2 कोटी वृक्षांची लागवड करीत हा वनमहोत्सव साजरा केला जाईल. या महोत्सवाच्या माध्यमातून लोकजागृती करणे हा एक उद्देश आहे.

2) प्रश्न :- सहभाग कोणाचा ?
उत्तर :- या वृक्ष लागवड कार्यक्रमात मुख्य भूमिका वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळाची असली तरी शासनाचे इतर विभाग, अशासकीय संस्था/ व्यक्ती व मोठे व्यापारी घराणे (Business Houses), क्लब, राज्य व केंद्र शासनाचे उपक्रम, भारतीय सेना, लोक सेवक संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. वृक्ष लागवडीचा महोत्सव हा सर्वसामान्य जनतेचा उत्सव करावयाचा असून त्यासाठी सर्वसामान्य जनतेनेही पुढे यावयाचे आहे.

3) प्रश्न :- वन विभागाची भूमिका काय ?
उत्तर :- वन विभागाची भूमिका ह्या कार्यक्रमात सर्वात महत्वाची आहे. वनक्षेत्रामध्ये वनविभाग, वनविकास महामंडळ तसेच वनेतर क्षेत्रात सामाजिक वनीकरण विभाग यांनी त्यांचे नियमित योजनांमधून वृक्षांची लागवड करावयाची आहे. धुळे जिल्ह्यात वनविभागातर्फे 5 लाख, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 15 हजार, तर इतर यंत्रणांच्या माध्यमातून 1 लाख 50 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याशिवाय शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था किंवा व्यक्तींना रोपे पुरवठ्याची कामे सुध्दा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग करणार आहे. तसेच इतर सर्व विभागांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, त्यांना रोप लागवडीच्या कामात मदत करणे हे सुध्दा वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागातर्फे करण्यात येत आहे.

4) प्रश्न :- सामाजिक वनीकरण विभागाची भूमिका काय ?
उत्तर :- सामाजिक वनीकरण विभागाकडील रोपवाटिकांमधून इतर शासकीय विभागांना रोपांचा पुरवठा करणे, ज्या शासकीय विभागांना लागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, इतर विभागाची लागवडीची माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे हे सामाजिक वनीकरण विभागाचे काम आहे. उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग हे जिल्हास्तरावर संपर्क समन्वय अधिकारी आहेत.

5) प्रश्न :- अन्य शासकीय विभागांचा सहभाग कसा राहील?
उत्तर : जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिलेले आहे. त्या- त्या विभागांनी रोप लागवडीकरिता जागेची निवड करीत लागवडीचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यासाठी विभागाकडील आकस्मिक निधीतून निधी उपलब्ध करुन लागवडीची कामे करावयाची आहेत. त्या लागवडीकरीता रोपे सामाजिक वनीकरण विभाग, वन विभागाकडून उपलब्धतेनुसार प्राप्त करुन घ्यावयाची आहे आणि रोपे लागवडीकरिता तांत्रिक मार्गदर्शन सामाजिक वनीकरण विभागाकडून घ्यावयाचे आहे.

6) प्रश्न :- अशासकीय संस्था किंवा व्यक्ती यांचा उपयोग कसा होणार ?
उत्तर :- अशासकीय संस्था किंवा व्यक्ती यांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावयाचा असल्यास रोपवनासाठी जागा निवडून सामाजिक वनीकरण विभागाकडून सवलतीच्या दराने रोपे प्राप्त करुन लागवडीची कामे करावयाची आहेत. याशिवाय रोप लागवड स्वत: करणे शक्य नसेल, तर अशासकीय संस्थेने त्यांच्या कार्यकर्त्यांना वन विभाग किंवा सामाजिक वनीकरण विभाग यांचे रोप लागवडीचे ठिकाणी रोपे लागवडीचे कामात सहकार्य करण्याकरिता उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.

7) प्रश्न :- रोपे कोठून मिळणार त्याची किंमत कशाप्रकारे राहील ?
उत्तर :- रोपे सामाजिक वनीकरण विभाग व वनविभागाच्या रोपवाटिकेत तयार करुन ठेवली आहेत. या रोपांना वनमहोत्सव कालावधीमध्ये सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करुन देता येणार आहेत. ज्या शासकीय विभागामध्ये आकस्मिक निधी उपलब्ध नाही, अशा विभागांना विनामूल्य रोपे उपलब्ध करुन देता येतील. वनमहोत्सवाच्या कालावधीत रोपांचा सवलतीचा दर नियमित दरापेक्षा 50 टक्के कमी असेल.

8) प्रश्न :- सीएसआरचा उपयोग कसा होईल ?
उत्तर :- सीएसआरमध्ये निधी उपलब्ध असल्यास रोपवन कामासाठी सीएसआर निधीचा उपयोग सुध्दा करता येईल. याशिवाय जाहिरातीसाठीही सीएसआर निधीचा उपयोग करता येतो.

9) प्रश्न :- जिल्हा समन्वयक अधिकारी आणि तालुका समन्वय अधिकारी यांचे कर्तव्य काय ?
उत्तर :- उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग यांना जिल्हा समन्वयन अधिकारी नेमण्यात आले आहे. सर्व विभागांना तांत्रिक मार्गदर्शन देणे तसेच त्यांना त्यांचे स्थळाबाबत माहिती महाराष्ट्र शासन वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे तसेच वनीकरणाकरिता आवश्यक रोप जवळच्या रोपवाटिकेतून उपलब्ध करुन देणे व जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधणे हे काम समन्वयन अधिकाऱ्यांना सोपविले आहे. तालुका समन्वयन अधिकाऱ्यांना वरील कामाशिवाय रोपवन स्थळाची पाहणी करुन रोपवन स्थळाची निवड योग्य आहे किंवा कसे तसेच प्रत्येक रोपवनाकरिता मजूर उपलब्धतेबाबत नियोजन करणे तसेच कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभाग कसा द्यावा याबाबत मार्गदर्शन करणे हे आहे.

10) प्रश्न :- स्थळांची नोंद कशी होईल ?
उत्तर :- सर्व रोपवन स्थळांची नोंद वन विभागाच्या संकेतस्थळावर तयार केलेल्या ॲपमध्ये करणे आवश्यक आहे. स्थळांची नोंद करणेबाबत काही अडचण असल्यास जिल्हा समन्वय अधिकारी यांचे कार्यालयात प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची निवड केलेली आहे. सर्व लागवड स्थळांची नोंद होणे आवश्यक आहे. ज्या स्थळांची नोंद संकेतस्थळावर नाही, अशा स्थळांची लागवडीची मोजणी 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये करता येणार नाही.

11) प्रश्न :- साइट को-ऑर्डिनेटर म्हणजे काय ?
उत्तर :-साइट को-ऑर्डिनेटर हे 1 जुलै रोजी प्रत्येक साइटवर नियुक्त नियंत्रक अधिकारी हे 1 जुलै रोजी दर दोन तासांनी संकेतस्थळावर झालेली लागवडीबाबत माहिती मोबाईल ॲपद्वारे अपलोड करतील.

12) प्रश्न :- आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आलेले आहे काय ?
उत्तर :- वन विभाग, सामाजिक वनिकरण विभाग व वनविकास महामंडळाच्या स्थळांकरिता मनुष्यबळाचे नियोजन केलेले आहे. यात नियमित मजुरांशिवाय स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा उपयोग करण्यात येणार आहे. या शिवाय इतर विभागांचे मनुष्यबळांबाबत नियोजनाबाबत कार्यवाही पूर्णत्वास आली आहे.

13) प्रश्न :- आपली भूमिका काय ?
उत्तर :-जिल्हाधिकारी जिल्ह्यासाठी या योजनेच्या अंमलबजावणी करीता मुख्य नियंत्रक अधिकारी आहेत. याशिवाय सर्व विभागांमध्ये समन्वय साधणे, उद्दिष्ट वाटप करणे आणि त्याप्रमाणे उद्दिष्टांची पूर्ती होईल याची खात्री करावयाची आहे.

14) प्रश्न :- 1 जुलै रोजी किती रोपे लावले जातील याची मोजणी कशी होणार ?
उत्तर :- धुळे जिल्ह्यात 1 जुलै रोजी 6 लाख 65 हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. संगणक प्रणालीत 6 लाख 96 हजार 360 रोपांच्या लागवडीची माहिती भरण्यात आली आहे, तर 6 लाख 66 हजार 945 खड्डे आतापर्यंत खोदण्यात आले आहेत. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग मिळून उपलब्ध रोपांची संख्या 11 लाख 87 हजार 585 आहे. इतर यंत्रणांना देण्यासाठी 1 लाख 47 हजार रोपे उपलब्ध करुन दिली होती. कृषी विभागाकडे 70 हजार 196, तर खासगी रोपवाटिकेत 40 हजार रोपांची उपलब्धतता आहे. लागवडीची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी एक विशेष मोबाईल ॲप तयार केले आहे. अँड्राइड मोबाईल फोनद्वारे दर दोन तासांनी स्थळ समन्वयक सरळ संकेतस्थळावर माहिती भरतील.

15) प्रश्न :- रोपे लावल्यानंतर रोपांचे संरक्षण कसे होणार ?
उत्तर :- रोपांच्या लागवडी नंतर वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वन विकास महामंडळांनी तयार केलेल्या 3 किंवा 5 वर्षांच्या योजने प्रमाणे रोपांची देखभाल करणे अभिप्रेत आहे. इतर विभागांनी लागवड केलेल्या रोपांबाबत तशीच योजना तयार करुन रोपांची देखभाल करणे अपेक्षित आहे. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालयाच्या आवारात लावलेल्या रोपांबाबत संबंधित नियंत्रक अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रोपांची निगा ठेवणे अपेक्षित आहे. याबाबत सामाजिक वनीकरण विभाग वेळोवेळी मार्गदर्शन करेल.

16) प्रश्न :- प्रचार / प्रसिध्दीकरिता काय योजना केली आहे ?
उत्तर :- प्रचार प्रसिध्दी करीता स्थानिकस्तरीय योजना तयार केली आहे. जिल्हास्तरावर प्रसिध्दीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे समन्वयक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. वृक्षलागवडीविषयी प्रसारमाध्यमांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. वृक्षलागवडीच्या बातम्यांना माध्यमे ठळक प्रसिध्दी देत आहेत. त्यामुळे वातावरण निर्मिती होत आहे.

17) प्रश्न :- वृक्ष लागवड कुठे व कशी करावी व अंतर किती ठेवावे ?
उत्तर :- वृक्ष लागवड घर, शाळेच्या मोकळ्या जागेत, कार्यालयाचे आवारात, रस्त्याचे दुतर्फा, धार्मिक स्थळे, शेताच्या बांधावर किंवा कोणत्याही मोकळ्या जागेवर करता येते. ही लागवड पावसाळ्याच्या सुरवातीला शक्यतो जमिनीमध्ये 1.50x1.50x1.50 आकाराचे खड्डे खोदून त्यामध्ये चांगली माती व खत टाकून त्यात पिशवीतील रोपे पिशवी वेगळी करुन लावावीत. रोपांमध्ये आंबा, वड, पिंपळ, उंबर या सारखे वृक्षामध्ये 6 मीटर अंतर ठेवावे व इतर काही घेरेदार वृक्षांसाठी 4 मीटर अंतर ठेवावे.

18) प्रश्न :- घराच्या परिसरात कोणती वृक्ष लावावीत ?
उत्तर :- घराच्या परिसरात मोठी घेरेदार वृक्ष लावू नयेत.

19) प्रश्न :- मोठे वृक्ष घराचे बांधकामापासून किती अंतरावर लावावीत ?
उत्तर :- मोठे वृक्ष उदा. वड, पिंपळ, आंबा, चिंच अशा वृक्ष प्रजातींचे घराच्या बांधकामापासून किमान 10 मीटर अंतरावर लागवड करावी. अन्यथा अशा वृक्ष प्रजातींच्या मुळामुळे बांधकामास तडे जावू शकतात.

20) प्रश्न :- दाट सावली देणारे वृक्ष कोणते ?
उत्तर :- कडूनिंब, वड, पिंपळ, आंबा, चिंच, बकुळ, जांभूळ, करंज ही दाट सावली देणारे वृक्ष आहेत.

21) प्रश्न :- शेताच्या बांधावर लावण्याच्या प्रजाती कोणत्या आहेत ?
उत्तर :- शेताचे बांधावर जमिनीच्या प्रतीनुसार लागवड करावी.
1) उत्तम पाण्याचा निचरा असणारी मुरमाड जमीन – सागवान, बिजा, तिवस, बांबू.
2) पाण्याचा निचरा नसणारी जमीन- अर्जुन, बाभूळ, निलगिरी, करंज.

22) प्रश्न :- शेतीच्या सभोवताल कुंपणासाठी कोणत्या प्रजाती वापराव्यात ?
उत्तर :- कुंपणासाठी बांबू, सीताफळ, सागरगोटी, करवंद, चिलाटी अशा प्रजातींची लागवड करावी.

23) प्रश्न :- जमिनीची धूप थांबविण्यासाठी कोणत्या प्रजाती लावाव्यात ?
उत्तर :- जमिनीची धूप थांबविण्यासाठी बांबू, घायपात, खसगवत सारख्या प्रजाती लावाव्यात.

शब्दांकन : रणजितसिंह राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, धुळे
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा