महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सक्रिय लोकसहभागाच्या पेडगाव पॅटर्नचा आदर्श इतर गावांनी घ्यावा- पालकमंत्री रावते सोमवार, २६ जानेवारी, २०१५
परभणी : राज्याच्या काही भागात निर्माण होणाऱ्‍या टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या योजनेत जलसंधारणांतर्गत विविध कामे घेण्यात येत आहेत. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होण्याची गरज असून जलसंधारणांतर्गत विविध कामांसाठी पेडगाव ग्रामस्थांनी लोकसहभागातून ८ लक्ष रूपयांचा निधी उभारला आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद असून सक्रिय लोकसहभागाच्या ‘पेडगाव पॅटर्न’ चा आदर्श इतर गावांनीही घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.

परभणी तालुक्यातील पेडगाव येथील लघुसिंचन तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री श्री. रावते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार संजय (बंडू) जाधव, आमदार मोहन फड, जिल्हाधिकारी एस.पी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. डुंबरे, पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार संतोष रूईकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.के. दिवेकर, कल्याणराव रेंगे, सकुबाई लटपटे, पेडगावचे सरपंच जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. रावते म्हणाले, यंदा मराठवाड्यात तुलनेने खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. खरीप २०१४ हंगामातील बाधित गावातील शेतकऱ्‍यांना जिल्‍हानिहाय निधीचे वाटप करण्‍यात आले असून परभणी जिल्‍ह्यासाठी प्राप्‍त ९५.३५ कोटीचा निधी वाटप करण्‍यात आला आहे. मात्र टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आता विविध उपाययोजना प्रभावीपणे अमलात आणण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी एस.पी. सिंह म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 170 गावांत जलसंधारणाची विविध कामे घेण्यात आली आहेत. यामध्ये सिमेंट नाला बांधामधील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण यासारखे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सिमेंट नाला बांध व अन्य प्रकल्पांमधील गाळ काढल्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढेल व काढलेला गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरेल. मात्र या सर्व कार्यक्रमांमध्ये पेडगाव ग्रामस्थांसारखा सक्रिय सहभाग लाभला पाहिजे.

जलयुक्त शिवार अभियान

पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, राज्याच्या सिंचनक्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करणे, भूजल अधिनियमाची अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठा निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेले बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे आदी जलस्तोत्रांची साठवण क्षमता वाढविणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत आणि कार्यक्षम वापराबाबत प्रभावी जनजागृती तसेच वृक्षलागवडीस प्राधान्य देणे ही जलयुक्त शिवार अभियानाची काही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाची खोलीकरण आणि रुंदीकरणासह कामे, जुन्या जलसंरचनांचे पुनर्जीवन, कोल्हापूर पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे अन्य तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, छोटे ओढे/नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर/बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण, कालवा दुरुस्ती या उपाययोजनावर भर देण्यात येणार आहे. कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघु सिंचन, जलसंपदा, जिल्हा परिषदेकडील कृषी व लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, अशा जिल्हास्तरीय यंत्रणांमध्ये समन्वय राखून हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share Print This Result