महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जलयुक्‍त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा - मुख्‍यमंत्री गुरुवार, ०५ मार्च, २०१५
परभणी : पाण्‍याच्‍याबाबतीत प्रत्‍येक गाव स्‍वयंपूर्ण होण्‍यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्‍यात यावे, असे आवाहन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गंगाखेड तालुक्‍यातील मरगळवाडी येथील जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत लोकसहभागातून तलावातील गाळ काढण्‍याच्‍या मोहिमेची पाहणी मुख्‍यमंत्र्यांनी बुधवारी केली. त्‍याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दिवाकर रावते, पाणी पुरवठा व स्‍वच्‍छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार संजय (बंडू) जाधव, आमदार सर्वश्री मधुसुधन केंद्रे, डॉ.राहुल पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, औरंगाबाद विभागाचे महसूल आयुक्‍त डॉ.उमाकांत दांगट, जिल्‍हाधिकारी एस.पी. सिंह, मुख्‍य कार्यकारी अधिकारी एस.एस. डुंबरे आदी उपस्थित होते.

मुख्‍यमंत्री म्‍हणाले, टंचाईवर मात करण्‍यासाठी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्‍यात आली आहेत. प्रत्‍येक गावाचा जल आराखडा तयार करण्‍यात येत असून जून महिन्‍यापर्यंत राज्‍यातील पाच हजार गावे टंचाईमुक्‍त करण्‍याचे उद्दीष्‍ट ठेवण्‍यात आले आहे. तलावातून गाळ काढण्‍याच्‍या मोहिमेत गावकऱ्‍यांनी पुढाकार घेतल्‍यास टंचाईवर निश्चितपणे मात होईल तसेच शेतीच्‍या उत्‍पादनांतही वाढ होईल.

जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत घेण्‍यात येणाऱ्‍या कामासाठी शासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, या कामासाठी हजार कोटी रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्‍यात आलेली आहे. वाहून जाणारे पाणी आडवण्‍यावर प्रत्‍येकांनी जास्‍तीत जास्‍त भर देण्‍याचा प्रयत्‍न करावा जेणेकरुन टंचाईवर मात करता येईल, असेही मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले.

मरगळवाडी जलाशयातून गाळ काढण्‍याच्‍या मोहिमेला २६ डिसेंबर २०१४ पासून प्रारंभ झाला आहे. या जलाशयातून २८ फेब्रुवारी २०१५ पर्यंत लोकसहभागातून १,३३,३३८ घन मीटर गाळ काढण्‍यात आला असून यामुळे पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार आहे. या मोहिमेमुळे ९ गावाच्‍या शेतकऱ्‍यांना फायदा होणार आहे.
Share बातमी छापा