महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यास मंजुरी बुधवार, १५ मार्च, २०१७
बातमी
रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी
म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन, लोणार, माहूर देवस्थानासाठीही मोठा निधी

मुंबई :
रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी तर म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन, लोणार, माहूर देवस्थानासाठीही मोठ्या निधीचा आराखडा करण्यात आला आहे. यावेळी विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले.

पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी समितीची बैठक झाली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव सुमित मल्लिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, रायगड, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड येथील जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटकांसह स्थानिकांच्याही सोयी-सुविधांचा प्राधान्याने विचार करावा. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्याच्या कामाचे नियोजन व दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे. रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा

रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास आराखडा 607 कोटी रुपयांचा असून पर्यटकांना/नागरिकांना किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखविण्यासाठी शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे.

म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा

म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा 438 कोटी 44 लाख रुपयांचा असून रस्ते विकास, सुलीभंजन आणि म्हैसमाळसाठी पाणीपुरवठा तसेच मल:निस्सारण, लघु प्रकल्प बांधकाम/साठवण क्षमता वाढवणे, धर्मशाळा बांधणे व हौज-ए-खास, पांगरा आणि धरम तलावांचे सुशोभीकरण करणे, माहिती केंद्र, स्वच्छता गृह, वाहनतळ, पर्यटक निवास, बनी बेगम बाग, खुलताबाद, निजामशाहची कबर, मालोजीराजे भोसले गढी, वेरुळ इ. संरक्षित स्मारकांचे संवर्धन व जोपासना आदी कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.

माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा

माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा 216 कोटी 13 लाख रुपयांचा असून मंदिराकडे जाणारे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर व रस्त्यावर विजेची सोय तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भक्त निवास आदी उभारण्यात येणार आहे. तसेच माहूर देवस्थान येथील वन विभागाच्या 10हजार हेक्टरमध्ये रोहयोच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा

लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा 93 कोटी 46 लाख रुपयांचा असून दुर्गा टेकडी येथे रिसर्च सेंटर, प्रयोगशाळा, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय बांधणे, सरोवराभोवती सुरक्षा कक्ष, पदपथ, व्हुयविंग प्लॅटफॉर्म, सूचना फलक, प्रदूषण विरहित बसेस व परिसर सुशोभीकरण करणे, ऐतिहासिक मंदिराचे संवर्धन करणे, प्रथमोपचार केंद्र, ध्यानसाधना केंद्र, प्रतीक्षागृह, प्रयोगशाळा व सभागृह, शासकीय इमारतीचे रुपांतर, क्लॉक रुम इत्यादी कामांचा समावेश आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा