महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
तरुणांना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' हक्काचे व्यासपीठ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, २६ डिसेंबर, २०१६
बातमी
आयआयटी पवईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
उत्कृष्ट संकल्पनांची शासन अंमलबजावणी करणार

मुंबई
: 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' कार्यक्रमाद्वारे ५०० विविध महाविद्यालयांमध्ये विकासाच्या १२ घटकांवर संकल्पना मागविल्या असून उत्कृष्ट संकल्पनांची शासन अंमलबजावणी करणार आहे. वेगवेगळ्या कल्पना मांडण्यासाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे हक्काचे व्यासपीठ असून यात प्रत्येकाने आपल्या कल्पना मांडण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुंबईतील पवई येथील आयआयटीच्या मूड इंडिगो फेस्टिव्हलमध्ये मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’या विशेष कार्यक्रमाचे उदघाटन केले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित आयआयटी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते http://transformmaharashtra.com/ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छोटी मुलाखतही घेतली. या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराला येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी दाद दिली.

पुढील पाच वर्षांत देशाला 'कॅशलेस नेशन' बनविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग द्यावा, जेणेकरुन मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्यांना याचा लाभ मिळेल. डिजीटल पेमेंटला प्राधान्य देताना आजच्या तरुणाईने कॅशलेस भारत घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

देशभक्तीचा एक भाग म्हणून आजच्या तरुणांनी पुढे येऊन कमीत कमी प्रत्येकी २० जणांना डिजीटल पेमेंट पद्धती समजावून सांगावी, त्यांना डिजीटल तंत्रज्ञानाबाबत साक्षर करावे, जेणेकरून डिजीटल पेमेंटबद्दल जनजागृती वाढेल. असे झाले तर कॅशलेसच्या क्षेत्रात आपला देश आगामी काळात पुढे राहील. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. या नोटबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा, बनावट नोटा आणि भ्रष्टाचाराला आळा बसणार असून भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे ते उचललेले महत्वाचे पाऊल असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

प्रत्येक पिढीच्या वेगळ्या कल्पना असतात, आजची देशाची लोकसंख्या पाहता युवकांची संख्या मोठी आहे. युवकांच्या कल्पना आणि कौशल्य देशाची नवी ओळख निर्माण करेल. हे करत असताना प्रगतीच्या आड येणारे गरीबी, शिक्षणाचा अभाव या घटकांचाही विचार करावा लागेल. या सगळ्या घटकांवर मार्ग काढून आपल्याला पुढे जावे लागेल. आमच्या शासनाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नावाची कल्पना मांडली, या कल्पनेला युवा वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातून तरुणांनी राज्याच्या विकासात मोठा सहभाग नोंदवला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी भाषणात नमूद केले.

आज आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासन सेवेत येऊन विकास प्रक्रियेचा भाग व्हायचे आहे ही आनंदाची बाब आहे. आज आयआयटी पवई येथे आल्याने आणि इथे जमलेल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कळले की आपण राज्याच्या विकास प्रक्रियेत येण्यास उत्सुक आहात. आपले कौशल्य आणि विकासाच्या वेगळ्या संकल्पनांचे राज्य शासनामार्फत स्वागत करून या विकासप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमा दरम्यान सूत्रसंचालक आणि ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मी भारताच्या संविधानाचा अनुयायी आहे, मी संविधानाचे अनुसरण करतो. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, बदल घडविण्यासाठी राजकारणात पदावर असणे आवश्यक आहे. आजचे तरुण त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेच्या आधारेच पुढे जाऊ शकतात हे खरे आहे. त्यामुळे व्यक्तीमधली गुणवत्ता यालाच प्राधान्य आहे. आजही महाराष्ट्रातील काही वर्ग अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही. या प्रवाहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन घेण्यासाठी त्यांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आरक्षण देणे ही गरज आहे. यापूर्वी आयआयटीएन्स विद्यार्थ्यांसाठी शासन सेवा हा करियरचा शेवटचा पर्याय असायचा, मात्र आता हे बदलेले चित्र सुखावह असल्याचे सांगितले.

'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र' याबाबत महत्वाचे मुद्दे

  • ॲक्शन फॉर कलेटिव्ह ट्रान्स्फार्मेशन या उपक्रमाअंतर्गत मूड इंडिगोमार्फत महाराष्ट्राच्या बदलत्या जडणघडणीचा विषय घेण्यात आला आहे.
  • यावेळी ५०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामध्ये असणार आहे.
  • राज्यातील महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी, शाश्वत विकासासाठी तरुण वर्गाची कल्पकता व ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्यासाठी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या कामकाजात लोकसहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ११ मुख्य समस्यांवर उपाय करण्यासाठी विद्यार्थी आपले जे मत व्यक्त करतील, त्यानुसार राज्यातील विकासाची योजना बनवण्यात येणार आहे.
  • राज्यातील विकासाविषयी युवकांचे मत नेमके काय आहे हे जाणून घेणे महत्वाचे वाटते. या उपक्रमाद्वारे युवकांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ हा कार्यक्रम सुरु केला आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा