महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०१७
बातमी
मुंबई : राष्ट्रीय महामार्गाची व जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

आज वर्षा निवासस्थानी राष्ट्रीय महामार्ग व जलसिंचन प्रकल्पाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.

यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर रिंग रोड, पार्डी उड्डाणपूल, पुणे-सातारा रस्ता, खेड-सिन्नर, जेएनपीटी रस्ता, पनवेल-इंदापूर चौपदरी रस्ता, सोलापूर-कर्नाटक बॉर्डर रस्ता, सोलापूर-येडशी, येडशी-औरंगाबाद, अमरावती-चिखली, तुळजापूर-औसा, औसा-चाकूर, लातूर बायपास रस्ता, चाकूर-लोहा, लोहा-वारंगा, वारंगा-महागाव-यवतमाळ रस्ता, यवतमाळ-वर्धा, नांदेड-हिंगोली-वाशीम-अकोला मार्ग, गोंडखैरी-कळमेश्वर-ढेपेवाडा-सावनेर रस्ता, फगणे-गुजरात-महाराष्ट्र बॉर्डर रस्ता, वणी-वरोरा, औरंगाबाद-धुळे, मुंबई-गोवा महामार्ग, नाशिक-सिन्नर, मुंबई-वडोदरा महामार्ग, कल्याण-निर्मल-नांदेड या रस्त्यांच्या कामाची सद्यस्थितीबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली.

यावेळी श्री.गडकरी यांनी सांगितले, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करुन मार्ग काढावा, या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर जमिन किती हस्तांतरित झाली, किती निधी खर्च झाला, किती निधी लागणार आहे, किती महिन्यात काम सुरु होणार, असे प्रश्न विचारुन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा