महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
आर्मड् कोअर सेंटरचे देशसेवेत मोलाचे योगदान - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवार, १५ एप्रिल, २०१७
बातमी
अहमदनगर : देशाच्या संरक्षणासाठी आर्मड् कोअर सेंटर ॲन्ड स्कूलने (एसीसीएस) केलेली कामगिरी अतुलनीय आणि बहुमोल आहे. या संस्थेचा इतिहास गौरवशाली आणि देदीप्यमान असून देश संरक्षणासाठी त्याग, समर्पणवृत्तीने केलेले काम मोलाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.

राष्ट्रपती श्री.मुखर्जी यांच्या हस्ते आज आर्मड् कोअर सेंटर ॲन्ड स्कूलला (एसीसीएस) आतापर्यंतच्या कामगिरीचा सन्मान म्हणून ध्वजप्रदान करण्यात आला. एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांनी राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.एम. हैरिज, लष्कराच्या प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.आर. सोनी, एसीसीएसचे कमाडंट मेजर जनरल दीक्षित, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, महापौर सुरेखा कदम, खासदार दिलीप गांधी, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्यासह विविध वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.

श्री.मुखर्जी म्हणाले, 1948 पासून देशसेवेत समर्पीत आर्मड कोअर सेंटरने त्याग, समर्पण, व्यावसायिक कौशल्य आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श प्रस्तूत केला आहे. एक शांतताप्रिय देश म्हणून राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपल्या क्षमतेचा उत्तमरितीने उपयोग केला आहे. नव्या आव्हानांना तोंड देत कवचीत कोअर भविष्यातही आपली गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या अत्युच्च दर्जाच्या प्रशिक्षणामुळे देशाने युद्धात उत्तम कामगिरी बजावली आहे. समर्पण आणि कठीण परिश्रमाच्या बळावर `सेंटर ऑफ एक्सलन्स`ची पात्रता एसीसीएसने मिळवली आहे. देशसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन आपल्या कौशल्याच्या बळावर संस्था यापुढेही उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांनी आपल्या भाषणात एसीसीएसच्या गौरवपूर्ण इतिहासाचा उल्लेख केला. एका अत्युत्तम दर्जा राखणारीही संस्था असून येथील अधिकारी आणि प्रशिक्षण घेऊन देशसेवेत दाखल झालेल्या जवानांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. हीच कामगिरी या संस्थेच्या समर्पण, व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण आणि देशप्रेमाने भारलेल्या भावनेचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या पथसंचलनाचे नेतृत्व ब्रिगेडीअर संदीप झुंझा यांनी केले. संचलनात लष्कराचे घोडदलातील अश्व, रणगाडा पथक आणि संचलन करणाऱ्या जवांनानी लक्ष वेधून घेतले. संचलनाच्या सुरुवातीला भीष्म रणगाडा, त्यानंतर अर्जुन रणगाडा आणि त्यावर सन्मानप्राप्त ध्वज घेऊन कर्नल राजदेव सुनील, अजेय रणगाडा असे अतिशय शानदार संचलन पार पडले.

सुखोई विमान आणि चेतक हेलिकॉप्टरने दिलेली सलामी संचलनाचे कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. कार्यक्रम स्मरणीय करण्यासाठी डाक विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या `फर्स्ट डे कवर `चे अनावरण यावेळी राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर श्री. मुखर्जी यांनी ट्रेनिंग स्कूल परिसरातील प्रदर्शनाला भेट दिली.

कवचित कोअर केंद्र आणि स्कूलला हा सन्मान मॅकेनाईज्ड युद्ध कौशल्य संस्थेच्या अग्रदूतच्या रुपात आपल्या उत्कृष्ट आणि कौतुकास्पद कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला आहे. देशातील सैनिक आणि मित्र राष्ट्राच्या सैनिकांना उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी ही संस्था जगभरात प्रसिद्ध आहे. कवचित कोअरच्या पराक्रमी घोडदळाला आपल्या साहसपूर्ण कामगिरीसाठी दोन व्हिक्टोरीया क्रॉस, दोन परमवीर चक्र, 16 महाविर चक्र आणि 52 वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा