महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
वंचितांसाठी काम, हीच खरी स्व. गोपीनाथरावांना श्रद्धांजली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, ०३ जून, २०१८
बातमी
बीड: स्व. गोपीनाथराव मुंडे हे वंचितांसाठी अहोरात्र झगडणारे, संघर्ष करणारे, त्यांना न्याय मिळवून देणारे जाणते संवेदनशील नेते होते. आपण सर्वांनी मिळून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, वंचितांसाठी क्षण न् क्षण काम करणे, त्यांचा विकास घडवून आणणे, हीच स्व. गोपीनाथरावांना खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परळी येथे केले.लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा 4 था पुण्यस्मरणदिन " सामाजिक उत्थान दिन" म्हणून येथील गोपीनाथगडावर आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सार्वजनिक आरोग्य व परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, श्रीमती प्रज्ञा मुंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रतिमा पूजनाने झाली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अनेकांचे खरे मार्गदर्शक आणि गुरू होते. माझ्या वीस वर्षाच्या राजकीय वाटचालीच्या चित्रात गोपीनाथराव प्रत्येक ठिकाणी आजही मला दिसतात. एक करारी, राजबिंडे मात्र तितकेच मायाळू व्यक्तिमत्त्व म्हणजे मुंडे साहेब. त्यांच्या अकाली जाण्याने माझे व्यक्तिगतच नव्हे तर महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय अपरिमित अशी हानी झाली आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात असा एकही गट वा व्यक्ती नाही जी स्वर्गीय गोपीनाथरावांना मानत नसेल. समोरच्या व्यक्तीतील नेतृत्व गुण ओळखून त्याच्याशी मैत्रीपूर्ण संवाद करणे, त्याच्यातील नेतृत्व गुणांचा वंचितांच्या प्रगतीसाठी लाभ करून घेणे, हे त्यांच्यातील कसब वाखाणण्याजोगे होते. कोणतेही राजकीय, आर्थिक पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावर, आत्मविश्वासाच्या बळावर गोपीनाथरावांनी स्वतःला सिद्ध केले. राजकीय, सामाजिक पटलावर मोठी मजल मारली. मात्र पराभवाने ते कधीही खचले नाहीत तर यशाने कधी हुरळूनही गेले नाहीत. सदैव मनात आणि कृतीत वंचितांच्या भल्याचाच विचार घेऊन जगणारे असे स्वर्गीय गोपीनाथरावजी असे लोकनेते होते.स्वाभिमान, संघर्ष, हिंमत म्हणजेच गोपीनाथराव. महाराष्ट्राचे नाव त्यांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. सत्तेशी संघर्ष करूनच मोठं होता येतं ही शिकवणही त्यांचीच आणि आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गुन्हेगारीला शह देणारे गृहमंत्री म्हणूनही स्व. गोपीनाथरावांची ओळख साऱ्या महाराष्ट्राला आहे. गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातच त्यांनी मुंबईला खंडणीमुक्त केले. गोपीनाथरावांनी राजकीय क्षेत्रातील अंडरवर्ल्डचे वर्चस्वही मोठ्या संघर्षातून नष्ट केले. सहकार क्षेत्रातील लोकांशी स्पर्धा करीत गोपीनाथरावांनी सहकारी साखर कारखाना नुसता उभाच केला नाही तर यशस्वीपणे मोठा केला आणि चालविलाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्वर्गीय गोपीनाथरावांचा त्याच ताकदीने वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, त्यांच्या भगिनी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या कामांचे विशेष कौतुक त्यांनी केले. गोपीनाथरावांच्या विचारांचा वारसा आम्ही सर्वजण मिळून असाच पुढे चालू ठेवू, त्यांच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी प्रत्यक्ष काम करू, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री श्रीमती मुंडे, श्री. जानकर, प्रा. शिंदे, श्री.खोत, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त करून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या केंद्रीय पेयजल व स्वच्छतामंत्री श्रीमती उमा भारती यांच्या ध्वनीचित्रमुद्रित संदेशाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमात "सामाजिक उत्थान दिन" म्हणून बीड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारे कुस्तीपटू राहुल आवारे, महिला क्रिकेटपटू कविता पाटील, शुगरकेन लिफ्ट मशीन बनवून हजारो ऊसतोड कामगारांचे कष्ट हलके करणारे गुरुलिंग स्वामी, अनाथांसाठी काम करणारे संतोष गर्जे यांचा विशेष सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गोपीनाथगड महिला बचतगट, राधेशाम महिला बचतगट, महिला ग्रामसंघ, प्रगती महिला ग्रामसंघ, हिरकणी प्रभागसंघ यांना विविध व्यवसाय व सामाजिक कार्यासाठी निधी व कर्जवाटप करण्यात आले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थिनींना अस्मिता कार्डचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे मित्र आणि राज्याचे कृषीमंत्री स्वर्गीय पांडुरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सूत्रसंचालन रमेश पोकळे यांनी केले तर आभार आमदार आर.टी. देशमुख यांनी मानले. यावेळी राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विजयराव पुराणिक, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरजितसिंह ठाकूर, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार लक्ष्मण पवार, आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार सुरेश धस, डॉ. अमित पालवे, डॉ. गौरव खाडे, ॲड. यशश्री गोपीनाथ मुंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, फुलचंद कराड, रमेश आडसकर, नामदेवराव आघाव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, अपर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा