महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार- मुख्यमंत्री रविवार, ०४ मार्च, २०१८
बातमी
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, अजूनही कर्ज योजनेची प्रक्रिया सुरू आहे. परंतु कर्जमाफी हा अंतिम उपाय नाही. जलसंधारणाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन, वीज आणि बाजारपेठेची उपलब्धता यातून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लासूर येथे व्यक्त केले.


लासूर येथे बजाज पाणी संवर्धन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील २६२ कोटी रुपयांतून १ लाख ५० हजार एकर क्षेत्रावर जलसंधारणाच्या कामांच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. देवयानी डोणगावकर, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार सर्वश्री अतुल सावे, प्रशांत बंब, बजाज उद्योग समूहाचे उपाध्यक्ष मधुर बजाज, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्दड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान या योजनेला लोकसहभागातून चळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मागील तीन वर्षात ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक पध्दतीत बदल झाला आहे. पूर्वी केवळ एकच पीक शेतकरी घेत असे आता तोच शेतकरी दोनदा पीक घेत आहे. या योजनेत लोकसहभाग हा देखील महत्वपूर्ण ठरला आहे. लोकसहभागातून सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी उभा राहिला आहे. पूर्वी पब्लिक–प्रायव्हेट-पार्टनरशिप (PPP) असे मॉडेल होते. परंतू आता शासनाने ‘पब्लिक-प्रायव्हेट-पिपल्स- पार्टिसिपेशन’ हे मॉडेल सुरू केले आहे. या मॉडलेमध्ये लोकांचा सहभाग हा महत्वपूर्ण असा ठरणार आहे. यापुढे जलसंधारणाच्या कामांसाठी एखाद्या समूहाने सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) ४५ टक्के निधी गुंतवल्यास उर्वरित ५५ टक्के निधी शासन गुंतवणार आहे. या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन ग्रामविकास साधला जाणार आहे. मागील तीन वर्षांत २५ हजार गावे दुष्काळाने होरपळली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे त्यात टप्या-टप्याने घट झाली आहे. जानकी देवी बजाज ग्राम विकास संस्थेने दुष्काळमुक्तीबरोबरच रोजगार उपलब्धीवरही भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.पाण्याच्या समन्यायी वाटपासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड योजने’संबंधी नुकताच इस्त्रायलबरोबर करार करण्यात आला आहे. ‘दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पा’च्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात सुमारे ५० टीएमसी एवढे पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी २५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. नुकतेच गंगापूर तालुक्यातील लासूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबीरातील एक हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापुढील काळात १० हजारांवर शस्त्रक्रिया मोफत स्वरुपात करण्यात येणार आहेत. याबद्दल आमदार प्रशांत बंब यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. त्याचबरोबर लासूर स्टेशन येथे नवीन पोलीस ठाणे लवकरच सुरू करण्यात येईल आणि ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनाच्या कामाला गती देण्यात येईल. जानकीदेवी बजाज ग्रामीण विकास संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक दायित्वातून कार्य करत आहे. या संस्थेने हाती घेतलेल्या कामात शासनाची सर्व यंत्रणा आपल्या पाठिशी असेल. या संस्थेच्या जलसंधारणाची कामे इतरांसाठी आदर्श ठरतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील रेल्वे क्रॉसिंगवर २५० उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात नुकताच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी करार झाला आहे. त्याअंतर्गत लासुर स्टेशन येथील उड्डाणपुलाचेही काम करण्यात येईल, असेही त्यांनी नमुद केले.

श्री.बागडे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हे लोकचळवळ बनले आहे. कौशल्य विकास आणि लोकसहभागावार जनतेने भर द्यावा. इतर देशांप्रमाणे आपणही कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा. केंद्र शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी एक कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कौशल्य शिक्षणावर प्रत्येकाने भर दिल्यास राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती साधली जाईल.

यावेळी मधुर बजाज, खासदार चंद्रकांत खैरे यांनी विचार मांडले. प्रास्ताविक श्री. त्रिपाठी यांनी केले. यावेळी संयोजकांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिमा भेट देऊन गौरव करण्यात आला तर श्री. फडणवीस यांच्या हस्ते मधुर बजाज यांना सन्मानित करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा