महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
संसर्गजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी माफसूत ‘सेंटर फॉर वन हेल्थ’केंद्र- प्रा. बलराम भार्गव शुक्रवार, ०८ मार्च, २०१९
बातमी

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

नागपूर :  संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासोबतच मानव-पशु आरोग्य तसेच वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वन हेल्थची संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आयसीएमआरने राष्ट्रीय विषाणू व विज्ञान संस्थेच्या नियंत्रणास माफसू येथे सेंटर फॉर वन हेल्थया एकमेव केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय स्वास्थ्य संशोधन विभागाचे सचिव तथा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 9व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बलराम भार्गव बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आशिष पातुरकर, कुलसचिव हेमंतकुमार पवार तसेच विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते.

आयसीएमआरतर्फे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या देखरेखीत माफसू परिसरातील चार हेक्टर परिसरात देशातील एकमेव सेंटर फॉर वन हेल्थसंस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगताना स्वास्थ्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. बलराम भार्गव म्हणाले की, या संस्थेमुळे मानव-पशु आरोग्यासोबतच सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यासासोबत मोठ्या प्रमाणात उद् भवणारे संसर्गजन्य आजार व त्यामुळे  परिसंस्थेत होणारे बदल याचेही निरीक्षण करणे सुलभ होणार आहे. दरवर्षी सरासरी नवनवीन आजाराचा प्रादुर्भाव व पुन:प्रसार होत असतो. यापैकी 75 टक्के पशुजन्य आजार आढळून येतात. 1940पासून आजपर्यंत 340 पेक्षा जास्त रोगकारक प्रसार झाला आहे. त्यापैकी 60 टक्के हे झुनोटिक तर 70 टक्के वन्यजीवापासून प्रसार पावले.  मानवास बाधित करणाऱ्या 14 ते 15 रोगकारक जीवाणूपैकी 61.6 टक्के हे पशुजन्य असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

माफसूसारख्या संस्थेमधून शिक्षण घेतल्यानंतर देशाच्या व समाजाच्या विकासासाठी आपली जबाबदारी वाढलेली आहे. उत्तम ज्ञान कौशल्य मिळविल्यानंतर त्याचा उपयोग शेतकरी बांधवांच्या श्वाश्वत जीवन विकासासाठी व राहणीमान उंचावण्यासाठी होईल, असा विश्वासही प्रा. भार्गव यांनी यावेळी व्यक्त केला.


महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा 9वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या विधिवत पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. आशिष पातुरकर यांनी प्रास्ताविक भाषणात विद्यापीठाचे शैक्षणिक तसेच संशोधनाबद्दल माहिती दिली. विद्यापीठांतर्गत  घटक महाविद्यालयामध्ये  एह हजार 781  पशु वैद्यकीय पदवी, 229 मत्स्य विज्ञान पदवी व 267 दुग्ध तंत्रज्ञान पदवीचे शिक्षण घेत आहेत.334 विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण शाखेत तर 63 विद्यार्थी आचार्य पदवी अभ्यासक्रमात असून विद्यापीठाच्या स्थापनेपासून  6 हजार 343 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.

माफसूच्या 9व्या पदवीदान समारंभामध्ये शैक्षणिक वर्ष 2016-17 आणि 2017-18 या शैक्षणिक वर्षात 991 पदवीकांक्षींना पदवी प्रदान करण्यात आली आह. यामध्ये 660 पदवीधर, 266 पदव्युत्तर तसेच 55 आचार्य पदवीधारकांचा समावेश आहे. 49 सुवर्ण व रजत पदक विद्यार्थ्यांनी मिळविले असून त्यापैकी 33 टक्के विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत.

मधुरा विश्वासरावला सर्वाधिक सात सुवर्ण

मुंबईच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मधुरा श्रीनिवास विश्वासराव हिला 2019-17 या शैक्षणिक वर्षात सर्वाधिक  सात सुवर्ण व दोन रजत पदके मिळाली आहेत. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये नागपूरच्या  महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशबू सुरतसिंग आडेला सात सुवर्ण व दोन रजत पदकांनी गौरविण्यात आले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या 9व्या पदवीदान समारंभात विद्यार्थी, पालक तसेच या क्षेत्रातील संशोधक व तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीदान समारंभाचा समारोप कुलसचिव हेमंत पवार यांनी केला.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा