महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
मराठवाड्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तनासाठी शासन कटिबद्ध - मुख्यमंत्री शुक्रवार, ०१ डिसेंबर, २०१७
बातमी
बीड जिल्हा सरपंच मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बीड -
मराठवाड्याच्या विकासाकरिता सर्व सिंचन प्रकल्पांसाठी शासन भरीव मदत करत असून मराठवाड्यातील जनतेच्या जीवनात परिवर्तनासाठी शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वडवणी येथे बीड जिल्हा सरपंच मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकासमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्ष मंगलाताई मुंडे, आमदार सर्वश्री जयदत्त क्षीरसागर, विनायक मेटे, आर. टी.देशमुख, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, संगीताताई ठोंबरे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे जलक्रांती झाली असून पाणी साठ्यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. फक्त बीड जिल्ह्यातच जलयुक्त शिवार योजनमुळे एक लाख टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून त्यातून 51 हजार हेकटर क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. मराठवाड्याबरोबरच जलयुक्त शिवार योजनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र जल स्वावलंबी झाला आहे. राज्यातील 11 हजार गावे टंचाईमुक्त झाली असून पुढील दोन वर्षात आणखी 11 हजार गावे टंचाईमुक्त करणार आहोत. लातूरमध्ये पूर्वी टँकर आणि रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागायचा पण आता तेथील पाणीटंचाई दूर झाली आहे. हे जलयुक्त शिवार योजनेमुळे होऊ शकले, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या कृषी विकासाचा दर वाढला असून तो 12.5 टक्के झाला आहे. कृषी उत्पादनात 40 हजार कोटी रुपयांची भर पडली असून शेतकऱ्याला व शेतीला पाणी देण्याचे काम शासनाने केले आहे. गेल्या दोन वर्षात मागेल त्याला वीज कनेक्शन दिले आहे. एक लाखापेक्षा अधिक विहीरी आणि 50 हजारापेक्षा शेततळी पूर्ण केली आहेत. मराठवाड्यात अजून विकास कामे करायची असून मराठवाड्याला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. बीड जिल्ह्याला कर्जमाफीसाठी 800 कोटी रुपये येणार असून 2 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. राज्यातील जनतेचा प्रत्येक पैसा जनतेसाठीच प्रामाणिकपणे वापरु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही देशातील एक क्रांतीकारी योजना असून 30 हजार कि.मी. चे रस्ते या योजनेतर्गत शासन पूर्ण करणार असून रस्ता तयार झाल्यावर संबंधित कंत्राटदाराकडेच पुढील 7 वर्षापर्यंत त्या रस्तयाची देखभालीची जबाबदारी दिली जाईल. याबरोबरच डिजिटल रस्ते गावापर्यंत गेले पाहिजे यासाठी 16 हजार ग्रामपंचायती पर्यंत फायबर कनेक्टीव्हीटी पोहचवली आहे. शाळा डिजीटल झाली तर शहर व गाव हा भेदभाव दूर होऊन जे शहरात शिकवले जाते तेच गावात शिकवले जाणार आहे. आतापर्यंत राज्यात 63 हजार शाळा डिजीटल केल्या असून यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे.
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे सुध्दा डिजीटल होत असून टेलिमेडीसीन सेवेची सुरुवात केली आहे. त्याद्वारे शहरात मिळणारी सर्व आरोग्य व्यवस्था गावात दिल्या जात असून हे मोठे परिवर्तन झाले आहे. गावागावांचा सर्वांगीण विकास होत असून सामान्य माणसाच्या जीवनात नवी पहाट निर्माण झाली आहे. उद्योग क्षेत्रातही प्रगती झाली असून गुंतवणूक वाढली आहे. स्वच्छ भारत अभियानात राज्यात 83 टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. 2019 पर्यंत राज्यातील प्रत्येक गरीबाला घर उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी सांगितले.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यावेळी म्हणाले, उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाच्या बंद नलिका कामाचे भूमिपूजन आज झाले असून येत्या जूनअखेर हे काम पूर्ण केले जाईल व यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होऊन 7 हजार एकर जमीन सिंचनाखाली येईल. खुल्या कालव्यांमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शासनाने प्रत्येक धरणासाठी बंद नलिकाचे काम हाती घेतले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांना व सिंचन व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे. पुढील काळात मराठवाड्यातील जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करीत आहोत.

पालकमंत्री पंकजा मुंडे आपल्या मनोगतात म्हणाल्या, जिल्ह्यात परिवर्तन घडवण्यासाठी मी काम करीत असून जिल्ह्यातील जनतेला स्व:चे घर, हक्काचे पाणी, गावा-गावात रस्त्याची कामे करण्यासाठी प्रयत्न करीत असून बीड जिल्हा राज्यात अग्रेसर करुन दाखवणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून डिसेंबर 2018 पर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे त्या म्हणाल्या.

याप्रसंगी आमदार आर.टी.देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाब्री मुंडे यांनी केले. सरपंच संजय आंधळे यांनी आभार व्यक्त केले. प्रारंभी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. या सरपंच मेळाव्यास जिल्ह्यातील सरपंच, तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा