महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
विधानपरिषद सभापती, मुख्यमंत्र्यांकडून वातानुकुलीत ''शिवशाही'' बसची पाहणी शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७
बातमी
मुंबई : एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकुलीत आणि आरामदायी अशा शिवशाही बसची आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमासह शिवशाही बसची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली.

विधानभवन प्रांगणाच्या बाहेर मान्यवरांनी आज शिवशाही बसची पाहणी केली.

प्रवाशांच्या सेवेत दोन हजार शिवशाही बसेस – मंत्री दिवाकर रावते
मंत्री श्री.रावते यावेळी म्हणाले, प्रवाशांना अधिक सुखकर तसेच किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी तसेच खासगी वाहतुकीकडे गलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व सुविधांनीयुक्त, वातानुकुलीत आणि आरामदायी अशा 2 हजार शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. या बसेस मुख्यत्वेकरून लांब पल्ला, मध्यम लांब पल्ला व आंतरराज्य मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबई – रत्नागिरी व पुणे –लातूर या मार्गावर ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती मंत्री श्री.रावते यांनी यावेळी दिली.

या बससाठी प्रती प्रवासी प्रती किमी साधारण दीड रुपया इतका किफायतशीर दर आहे. बसमध्ये प्रत्येक प्रवाशास स्वतंत्र मोबाईल चार्जर, सीट बेल्ट, पुशबॅक पद्धतीच्या सीटस, दोन एलसीडी टिव्ही अशा सुविधा आहेत. पूर्ण वातानुकूलित आणि आरामदायी असलेली शिवशाही बस प्रवाशांच्या निश्चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा