महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्यातील रेल्वे, रस्त्यांच्या कामाला गती येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७
बातमी
मनमाड-इंदौर नवीन ब्रॉडगेज मार्ग, सांगली-नाशिक मध्ये ड्रायपोर्ट, नागपूरात मल्टी मॉडेल हब

नवी दिल्ली :
राज्यात मनमाड-इंदौर हा नवीन ब्रॉडगेज मार्ग, सांगली व नाशिक येथे ड्रायपोर्ट, नागपूर येथे मल्टी मॉडेल हब, मुंबई येथे रोरा सेवा आणि पुणे रिंग रोड आदी महत्वाचे निर्णय आज दिल्लीत घेण्यात आले असून यामुळे राज्यातील रेल्वे व रस्त्यांच्या कामाला गती येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन तसेच रेल्व, जहाज वाहतूक व जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील रेल्वे व रस्ते प्रकल्पांबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्‍याविषयी श्री.फडणवीस यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांच्या कामाला लवकरच सुरूवात

वर्धा-नांदेड, परळी-बीड, नगर-बीड-परळी, गडचिरोली-वडसा देसाईगंज या रेल्वे मार्गांच्या कामाला तत्काळ सुरूवात करण्याचा निर्णय झाला. याचबरोबर मनमाड-इंदौर हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश मधून जाणाऱ्या नवीन ब्रॉडगेज मार्गाच्या कामाला मंजूरी देण्यात आली. रेल्वेमंत्र्यांची परवानगी घेऊन श्री.गडकरी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रेल पोर्ट कॉर्पोरेशन या कामासाठी पूर्ण गुंतवणूक करण्यावर एकमत झाले. यासाठी उभय राज्यांनी जमीन देण्याच्या अटीवर हा मार्ग पूर्णत्वास नेण्याचे ठरले.

या मार्गावरील कर्जत ते इगतपूरी, इगतपूरी ते मनमाड आणि इगतपुरी ते कसारा हा त्रिपदरी मार्ग तयार करण्याची जबाबदारी रेल्वे विभाग घेणार आहे, असा आज निर्णय घेण्यात आला.

नागपूर येथे मल्टी मॉडेल हब

नागपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी मॉडेल हबचे सादररीकरण केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले. या कामाला लवकरच सुरूवात करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. देशात नागपूर आणि वाराणासी येथे हे मल्टी मॉडेल हब उभारण्यात येणार आहे.

मुंबईत ‘रोरो सेवा’

मुंबईत प्रस्तावित असणाऱ्या रोरो सेवेचा आढावा घेण्यात आला. ही रोरा सेवा एप्रिल 2018 पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय परिवहन मंत्रालय, एमएमबी आणि सिडको हे संयुक्तरित्या काम करणार आहेत.

सांगली व नाशिक येथे ड्राय पोर्ट

सांगली आणि नाशिक या ठिकाणी ड्राय पोर्ट उभारण्यास केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मंजूरी दिली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिक भागात द्राक्ष, कांदा आदी शेती उत्पादने मोठ्याप्रमाणात निर्यात केली जातात. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना जेएनपीटीच्या माध्यमातून ही निर्यात करावी लागत असे आता नाशिक येथे ड्राय पोर्ट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना येथूनच आपला शेतमाल निर्यात करता येणे शक्य होणार आहे. राज्यासाठी हा महत्वाचा निर्णय असल्याचे सांगत या आधीच वर्धा आणि जालना येथे ड्रायपोर्टचे भूमिपूजन झाले असून ड्रायपोर्ट तयार करण्याच्या कामाला सुरूवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रिंग रोडसाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडून 1500 कोटी रूपयांच्या खर्चाला या बैठकीत मान्याता देण्यात आली . औरंगाबाद, जळगांव राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. चाकण मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्राधान्याने घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोस्टल इकोनॉमिक कॉरिडॉरमधील राज्यातील प्रकल्प, पोर्ट प्रकल्प इत्यादी बाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील लाखो हेक्टर सिंचनाखाली येणार - केंद्रीय जलसंपदा मंत्री गडकरी

महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते आणि पोर्ट संदर्भात आजच्या बैठकीत महत्वाचे निर्णय झाले. यासोबतच राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या 107 सिंचन प्रकल्पाच्या मंजूरीचा निर्णय झाल्याचे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि जलसंपदा मंत्री श्री.महाजन यांनी केंद्रीय अर्थमंत्री, प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव नृपेन मिश्रा आणि निती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक झाली, यात राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त व दुष्काळग्रस्त भागातील 107 सिंचन प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्रासाठी महत्वाचा असून यामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यासाठी महाराष्ट्राला 10 हजार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. पैकी 25% निधी केंद्र सरकार तर 75% निधी नाबार्डच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा