महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी पु.ल.जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन - सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे गुरुवार, ०८ नोव्हेंबर, २०१८
बातमी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई :
ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्राला जो सांस्कृतिक ठेवा दिला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.

विलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते प्रदीप वेलनकर, अतुल परचुरे, अशोक पानवलकर, सांस्कृतिक संचालनालयालयाच्या संचालक स्वाती काळे, मुकूंद चितळे आदी उपस्थित होते.


मंत्री श्री. तावडे म्हणाले, आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे आदी थोर पुरूषांची जन्मशताब्दी साजरी करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या महापुरूषांनी राज्याला जो सांस्कृतिक ठेवा दिला तो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाऊ शकलो तरच जन्मशताब्दी सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. महाराष्ट्रातील नव्या पिढीने सहज, सोप्या भाषेत साहित्य निर्माण करावे. यासाठी तालुकास्तरावर वर्षभर 100 कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून नावाजलेले साहित्यीक आणि नवोदित लेखक यांच्यामध्ये विचारांची आदान प्रदान होऊन दर्जेदार साहित्यीक तयार होतील.

यावेळी सांस्कृतिक मंत्री यांनी पु.ल. देशपांडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. मुंबई, पुण्यातील धकाधकीचे जीवन जगत असताना मनाला येणारा विषन्नपणा घालविण्यासाठी पु.ल. यांचे साहित्य कसे उपयोगी आहे हे सांगितले. पु.ल. यांचे साहित्य माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक उर्जा पुरवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.


महापौर श्री. महाडेश्वर यांनी प्रत्येक माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी जी साधना करावी लागते, त्यासाठी पु.लं.चे साहित्य किती उपयोगी आहे, याबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमात आमदार पराग अळवणी यांनी छायाचित्र प्रदर्शनामागची भूमिका विषद केली.

यावेळी कलाकार उपेंद्र भट, आदित्य ओक, विजय केंकरे, सोनिया परचुरे, प्रसाद पाध्ये, अर्चना गोरे, विनीत गोरे आदींचा सत्कार करण्यात आला. वीर सावरकर येथील पटांगणस्थळी आयोजित केलेली दृकश्राव्य प्रदर्शनी आठवडाभर चालू राहणार असून त्यानंतर ती मुंबई आणि उपनगरातील विविध महाविद्यालयात भरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक स्वाती काळे यांनी तर सूत्रसंचालन समीरा जोशी यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा