महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
वॉटर कप व ‘जलयुक्त’च्या माध्यमातून महाराष्ट्राची दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
बातमी
‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धेची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमिर खानने केली घोषणा

मुंबई :
पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जनता, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या, सेलिब्रिटी, शासन एकत्र आले असून याद्वारे जलसंधारणाची कामे होतील. महाराष्ट्रात मोठे परिवर्तन घडविणारे काम होत आहे. वॉटर कप व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 2019 पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या स्पर्धेसाठी राज्य सरकार सर्व सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 2016 आणि 2017 हे दोन वर्ष भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर ‘पाणी फाऊंडेशन’च्या वतीने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिसरी ‘सत्यमेव जयते वॉटर कप2018’ स्पर्धा जाहीर केली. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, रिलायन्स फाऊंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक मुकेश अंबांनी, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

लोकांना प्रेरणा देणारी, काम करण्याची मानसिकता तयार करणारी व लोकांचा आत्मविश्वास वाढविणारी ही चळवळ आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने सर्वसामान्यांना वेड लावले आहे. एखाद्या कामासाठी झपाटलेली, सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी व त्यातून आनंद घेणारी माणसे असे चित्र पहायला मिळाले. या स्पर्धेमुळे स्वावलंबी, एकसंघ झालेली गावे पहायला मिळाली आहेत. गावांतील लोकांनाच परिवर्तन करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करून घेण्यातच फाऊंडेशनचे यश आहे. वॉटर कप स्पर्धेला जनता, स्वयंसेवी संस्था, कार्पोरेट कंपन्या याबरोबरच सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी यांनी बहुमोल सहकार्य केले. पहिल्यादा कार्पोरेट कंपन्यांनी समाजातील शेवटच्या माणसाचा विचार करून या उपक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या स्पर्धेत सहभागी सात हजार गावांच्या माध्यमातून एक चतुर्थांश महाराष्ट्रातील लोक कामे करणार आहेत.

राज्य पाणीदार करायचे असेल तर मोठ्या धरणापेक्षा जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे. हे हेरून यापूर्वी जलयुक्त शिवार योजना सुरू केली आहे. हा कार्यक्रम सरकारी न करता तो जनतेचा असावा, असा निर्णय घेतला. लोकचळवळ असेल तर परिवर्तन घडत असते, हे गेल्या दोन वर्षात दिसले आहे. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेला सरकारच्या योजनांची जोड दिल्यास हे परिवर्तन अधिक वेगाने करता येईल, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरु केलेले काम आहे. या स्पर्धेत लोकांना प्रशिक्षण मिळून ते स्वत: आपल्या गावात श्रमदान करीत आहेत. या कामात सर्वच स्तरातील लोक श्रमदान करीत आहेत. या श्रमदानात काम करताना गोर गरिबांचा रोजगार बुडू नये यासाठी त्यांना रोहयो योजनेंतर्गत मजुरी व रोजगाराची हमी देण्यात येईल. या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेसाठी शासनाचा सहभाग राहील.

अभिनेता आमिर खान म्हणाले, वॉटर कप स्पर्धा ही गावांना पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण सहभागी गावातील लोकांना पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून देण्यात येते. ज्या गावांनी यापूर्वी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ती गावे पाण्यासाठी स्वयंपूर्ण झाली आहेत. स्पर्धेचे हे 3 रे वर्ष असून 7 हजार 200 पेक्षा गावांनी यात सहभाग घेतला आहे. या वर्षी ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली तर मोठा बदल दिसणार आहे. खऱ्या अर्थाने ते परिवर्तन ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासन यांची मोलाची साथ लाभली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ही स्पर्धा म्हणजे लोकचळवळ व्हावी, अशी सुचना केली होती. त्यामुळेच स्पर्धेला यश मिळत गेले. लोक स्वयंस्फुर्तीने सहभाग घेत आहेत. या स्पर्धेत कोणीच हरणार नाही. तर सर्वांनी मिळून दुष्काळाला हरवायचे आहे.

उद्योगपती रतन टाटा आणि मुकेश अंबानी पाणी फांऊडेशनला या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल, असे सांगितले.

जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले म्हणाले की, जलयुक्त शिवारमधील गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्यास त्यांना राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानात नसलेल्या गावांसाठी खासगी सार्वजनिक भागीदारीतून राज्य शासनामार्फत सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील गावांना उपचार क्षेत्राचे नकाशे शासनामार्फत देण्यात येतील. तसेच यावेळी श्री. भटकळ व पोळ यांनी यावेळी स्पर्धेची माहिती दिली.

‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धा

‘पाणी फाऊंडेशन’ ही संस्था आमीर खान व त्यांच्या पत्नी श्रीमती किरण राव यांनी स्थापन केली असून सन 2016 पासून राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी वॉटरकपच्या माध्यमातून लोक चळवळ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी 8 एप्रिल ते 22 मे 2018 आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये व 40 लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत विजेत्या गावांना एकूण 10 कोटी रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत. 45 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच यंत्रसामग्रीच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्वपूर्ण रचना उभारुन पाणी साठवण क्षमता निर्माण करतात.

गेल्या वर्षी झालेल्या ‘दुसऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत 30 तालुक्यांतील एकूण 1,321 गावांनी भाग घेतला आणि तब्बल 8,361 कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण केली. यात वर्धा जिल्ह्यातील अर्वी तालुक्यातील काकडधरा या लहान आदिवासी गावाने बाजी मारत वॉटर कप 2017 जिंकला.

यंदा ही स्पर्धा महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांपर्यंत विस्तारली आहे. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक गाव स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असून त्यांना आमंत्रण पाठवले गेले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने वॉटर कप स्पर्धेचा प्रवास दाखवणारे भव्य छायाचित्र प्रदर्शन या सर्व 75 तालुक्यात भरवले गेले असून त्याला लाखो ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. स्पर्धेची प्रवेशिका दोन भागात आहे. आतापर्यत साधारपणे 7,200 गावांनी प्रवेशिकेचा पहिला भाग सादर केला आहे. अर्जाच्या दुसऱ्या भागात गावाने ग्रामसभा घेऊन ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे घेतल्या जाणाऱ्या चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाच प्रशिक्षणार्थींची निवड करायची आहे. दुसऱ्या भागाची प्रवेशिका पूर्ण करुन पाठवण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 आहे.

‘सत्यमेव जयते वॉटर कप 2018’ स्पर्धेत सहभागासाठी निवडलेल्या 75 तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे :

उत्तर महाराष्ट्र विभाग

जिल्हा : जळगाव, तालुका : अमळनेर, पारोळा
जिल्हा : नंदुरबार, तालुका : शहादा, नंदुरबार
जिल्हा : धुळे, तालुका : धुळे, सिंदखेड
जिल्हा : नाशिक, तालुका : चांदवड, सिन्नर
जिल्हा : अहमदनगर, तालुका : जामखेड, पाथर्डी, अहमदनगर, पारनेर, कर्जत

पश्चिम महाराष्ट्र विभाग

जिल्हा : सातारा, तालुका : माण, खटाव, कोरेगाव
जिल्हा : सोलापूर, तालुका : सांगोला, उत्तर सोलापूर, करमाळा, बार्शी, माढा, मंगळवेढा
जिल्हा : सांगली, तालुका : आटपाडी, जत, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव
जिल्हा : पुणे, तालुका : बारामती, इंदापूर, पुरंदर

विदर्भ विभाग :

जिल्हा : बुलढाणा, तालुका : मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर
जिल्हा : अकोला, तालुका : अकोट, पातुर, बार्शी टाकळी, तिल्हारा
जिल्हा : वाशिम, तालुका : करंजा, मंगरुळ पीर
जिल्हा : अमरावती, तालुका : धारणी, वरुड, मोर्शी, चिखलदरा, नांदगाव
जिल्हा : यवतमाळ, तालुका : राळेगाव, कळंब, उमरखेड, यमवमाळ, घाटंगी, धारवा
जिल्हा : वर्धा, तालुका : अर्वी, देवळी, कारंजा घाडगे, सेलू
जिल्हा : नागपूर, तालुका : नरखेड

मराठवाडा विभाग

जिल्हा : औरंगाबाद, तालुका : खुलताबाद, फुलंब्री, वैजापूर
जिल्हा : बीड, तालुका : केज, धारुर, अंबाजोगाई, आष्टी, परळी वैजनाथ
जिल्हा : उस्मानाबाद, तालुका : कळंब, भूम, परांडा, उस्मानाबाद
जिल्हा : हिंगोली, तालुका : कळमनुरी
जिल्हा : परभणी, तालुका : जिंतूर
जिल्हा : नांदेड, तालुका : भोकर, लोहा
जिल्हा : जालना, तालुका : जाफराबाद
जिल्हा : लातूर, तालुका : औसा, निलंगा, देवणी
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा