महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
‘महापरिवर्तना’तून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन आरोग्य, जलसंधारणाच्या कामांमुळे ५० लाख नागरिकांना थेट लाभ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१९
बातमी
 मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापरिवर्तन : भागीदार विकासाचेसोहळा संपन्न
500 कोटी गुंतवणुकीच्या 62 सामंजस्य करारांद्वारे शासनासोबत भव्य भागीदारी

 

मुंबई : राज्य प्रशासन आणि खासगी संस्थांनी  एकत्रित येत महापरिवर्तनच्या माध्यमातून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवावे. सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे, असे आवाहन करतानाच आज झालेल्या भव्य भागीदारी सोहळ्यात आरोग्य आणि जलसंधारण क्षेत्रात सुमारे 500 कोटी रुपये गुंतवणुकीचे 62 सामंजस्य करार विविध सामाजिक संस्थांसोबत करण्यात आले. त्याचा राज्यातील 50 लाख नागरिकांना लाभ होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महापरिवर्तन : भागीदार विकासाचेहा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी यावेळी उपस्थित होते.
 

टाळ्यांच्या गजरात उभे राहून मुख्यमंत्र्यांना मानवंदना 

यावेळी मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य, जलसंधारण या क्षेत्रातील विविध विकास कामे आणि योजनांसाठी 62 खासगी संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कामी घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य झाल्याची भावना व्यक्त करीत सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उभे राहून मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठीच्या क्यू आर कोडचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

 शासन आणि खासगी संस्था यांच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी सामंजस्य करार होण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्याचा भव्य भागीदारी सोहळा असा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, सामान्य माणसाचे जीवन बदलण्याचे काम या भागीदारीतून होणार आहे. शासनाच्या पलिकडे जाऊन ज्या व्यक्ती, संस्था लोकहिताची कामे करतात त्यांना शासनासोबत परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी करण्याचा हा प्रयत्न आहे. चांगले काम करणारी संस्था आणि प्रशासन यांची सांगड घालून सामान्यांसाठी अधिक चांगले काम करण्यासाठी ही भागीदारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातली 16 हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ त्यामुळे झाली असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकसहभाग लाभलेली यासारखी दुसरी कुठली योजना नसेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. त्याचप्रमाणे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेतून  शाश्वत जलसिंचनाचे काम होत आहे. त्यातून शेती क्षेत्रातले नैराश्य दूर होण्यास मदत होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या सावटाखाली आहे. त्याला त्यातून सोडविण्याचे काम महापरिवर्तनच्या माध्यमातून करू या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. आरोग्य क्षेत्रातील सुमारे 40 विविध प्रकारचे सामंजस्य करार आज झाले. त्याद्वारे वंचितांच्या जीवनात परिवर्तन येईल, असे सांगतानाचा मानसिक आरोग्य आणि मौखिक आरोग्य या क्षेत्रात जास्त काम करण्याची गरज असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी  व्यक्त केली. समाजातील विविध घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे काम कौतुकास्पद आहे असे सांगत त्यांनी या संस्थांसोबतच यासाठी काम करणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालातील चमू, डॉ.आनंद बंग यांचे अभिनंदन केले.

श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल, टाटा ट्रस्ट, पिरामल स्वास्थ्य, व्हिजन फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन लॉ सोसायटी आणि मारीवाला हेल्थ इनिशिएटीव्हज, प्रोजेक्ट मुंबई, बन्यान आणि हंस फाऊंडेशन, बापू ट्रस्ट, स्पाईन फाऊंडेशन, इंडियन असोसिएशन ऑफ पेडीअट्रीक सर्जन्स, सेव्ह लाईफ फाऊंडेशन, कॅन किड्स, संगथ, एटीइ चंद्र फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, परिमल सर्वजल, फाऊंडेशन फॉर इकॉलोजीकल सिक्युरिटी, जे एस डब्ल्यू फाऊंडेशन, जल बिरादरी, आय आय टी मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था, डॉ.अमित मायदेव, नूर हेल्थ, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, पुणे, इंडियन ऑइल, डॉ.संदेश मयेकर, इंडिया इन्फोलाईन, टाटा ट्रस्ट आणि नानाजी देशमुख प्रतिष्ठान, महात्मा फुले कृषी  प्रतिष्ठान, मानवलोक, युवा मित्र, मारीको लिमिटेड, अक्सिस बँक फाऊंडेशन, स्कार्फ आदी संस्थासोबत आरोग्य आणि जलसंधारण क्षेत्रातील सांमजस्य करार करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर, अमित चंद्रा, डॉ.अमित मायदेव, डॉ. संदेश मयेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमास माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल,जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आदींसह विविध खासगी संस्थांचे प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा