महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
शेतकरी हाच देशाचा कणा... शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७
बातमी
साखर उद्योगाला स्थिरता आणण्याचा शासनचा प्रयत्न
‘जलयुक्त शिवार’मुळे तीन वर्षात २१ लाख हेक्टर संरक्षित सिंचन

पुणे :
शेतकरी हाच देशाचा कणा आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शासनाची भुमिका आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. अडचणीतल्या शेतकऱ्यांबरोबरच प्रामाणिक शेतकऱ्यांनाही सरकार मदत करणार असून शेतकरी हाच खरा हिरो असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मधुकरनगर-पाटस ता.दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल, आमदार बाबुराव पाचर्णे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार रंजना कुल, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे, साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील, वासुदेव काळे, चंद्रराव तावरे उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्याला उभे करण्याची ताकद सहकारी साखर कारखान्यात आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजेत, साखर उद्योग वाढला पाहिजे. यासाठी शासन कायमच साखर उद्योगाच्या मागे ठामपणे उभे आहे. साखर उद्योगाला स्थिरता आणण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. राज्यातील ९९.५ टक्के कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला दर दिला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. त्यामुळेच राज्याच्या शेती विकासाचा दर साडेबारा टक्के झाला आहे.

शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले. या माध्यमातून गेल्या तीन वर्षात राज्यात २१ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल झाला. अडचणीतील शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे शासनाने ऐतिहासिक कर्ज माफी केली आहे. मात्र याच बरोबर शेतीमधील गुंतवणूक वाढविण्यावर शासनाने भर दिला आहे. गेल्या काही वर्षात अर्धवट अवस्थेतील राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या दोन वर्षात हे अर्धवट असणारे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.

राज्याच्या सकल उत्पन्नात भर टाकणारा शेतकरी हाच सरकारचा ख्ररा हिरो आहे. त्यामुळे सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जाहिरातीत खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे मोठे फोटो वापरण्यात आले आहेत. ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत वापरण्यात आलेली सर्व माहिती ही खरी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

पंकजा मुंडे म्हणाल्या, साखर कारखाने नाही चालले तर शेतकरी वाचणार नाहीत. त्यामुळे साखर उद्योगाच्या मागे सरकार उभे राहणार आहे. अत्यंत अडचणीच्या स्थितीतून भीमा कारखाना जात आहे, अशा काळात सभासदांनी या कारखान्याच्या मागे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

गिरीश बापट म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कायमच प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे, ऊस उद्योगाचे प्रश्न सोडविण्याला सरकार प्राधान्य देत आहे.

महादेव जानकर म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. यामुळे कर्जमाफी सारखा मोठा निर्णय सरकाने घेतला आहे. दौंड विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी शासन निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहूल कुल यांनी राज्य शासनाने केलेल्या विशेष मदतीमुळे भीमा साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले.

यावेळी भीमा कारखान्याला विशेष मदत करुन कारखाना पुन्हा सुरू केल्या बद्दल कारखान्याच्या ५० हजार सभासदांच्यावतीने कारखान्याचे ज्येष्ठ सभासद, ज्येष्ठ कामगार व कार्यकारी संचालक आबासाहेब निबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा