महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नागपूरची औद्योगिक शहराकडे वाटचाल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, १४ एप्रिल, २०१८
बातमी
झिंगाबाई टाकळी येथील भुयारी मार्गाचे लोकार्पण

नागपूर :
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे नागपूर शहर बदलत असून औद्योगिक विकासाला चालना मिळत आहे. नागपूरच्या या बदलत्या स्वरुपामुळे जे उद्योजक येथे भेट देतात ते या शहराच्या प्रेमात पडतात आणि येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मानकापूर रेल्वेपुलाच्या खाली ओमनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर बांधण्यात आलेल्या भुयारी रेल्वे मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, महापौर नंदाताई जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते.


नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गुंतवणुकीला चालना मिळत असून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतानाच देशातील पहिला एरोस्पेस पार्क रिलायन्सच्या माध्यमातून मिहान येथे सुरु होत आहे. संपूर्ण विमान येथे निर्माण होत असल्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. रेल्वे उड्डाणपुलामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात असुविधांचा सामना करावा लागत होता. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अत्यंत कल्पकपणे यातून मार्ग काढून रेल्वे अंडरब्रिज तयार केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नागपूर हे राज्यातील उत्तम शहर झाले असून आरोग्य सेवासुद्धा उत्तम व्हाव्यात यादृष्टीने आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नागपूर शहर हे आता परिपूर्ण झाले असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


रेल्वे स्टेशनसमोरील रस्ता बांधकामासाठी 100 कोटी


रस्त्यावरील अपघात कमी करण्यासोबतच लोकांचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यांच्या विकासाला व रुंदीकरणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूरच्या रस्ते सुधारण्यासाठी आवश्यक असणारा संपूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासोबतच मेट्रो रेल्वेच्या विकासाचे 9 हजार कोटीचे काम सुरु असून बुटीबोरी, हिंगणा आदी विस्तारासाठी 800 कोटीची आवश्यकता आहे. मेट्रोच्या माध्यमातून नागपूरचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून विकास होत आहे.

नागपूर रेल्वे स्टेशन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्टेशन व्हावे, तसेच त्यासमोरील रस्त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनातर्फे 100 कोटी रुपये देण्यात येत असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, लोखंडी पूल ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावर असलेला उड्डाणपूल पाडून त्या जागी अत्याधुनिक पद्धतीने रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. नागपूर शहरात केवळ पायाभूत सुविधांचा विकास होत नसून बेघरांना 50 हजार घरे देण्याचा संकल्प असून त्यापैकी 10 हजार घरांच्या बांधकामाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

उद्योग विकासासोबतच येथील बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्याने सोडवून नागपूरसह विदर्भातील 50 हजार युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न असून त्यापैकी 22 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मिहान येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल आदी कंपन्या सुरु झाल्या असून इतरही आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे गुंतवणूक करणार आहेत. त्यासोबत मेट्रोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुयारी मार्गामुळे तीन हजार नागरिकांना सुविधा निर्माण झाली असल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळेच भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. या परिसरातील अनियमित असलेले भूखंड नियमित करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतल्यामुळे चार हजार कुटुंबांना मालकी हक्काचे घर मिळाल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता एम. चंद्रशेखर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी भुयारी रेल्वे मार्गाची लांबी 265 मीटर असून अडीच मीटर उंची असल्याचे सांगितले. या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी 19 कोटी रुपये खर्च आला आहे. या भुयारी मार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेच्या सुविधेसाठी प्राधान्याने बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन रेणुका देशकर यांनी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा