महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
अप्रमाणित, शिफारस नसलेले कीटकनाशक पुरविणाऱ्या कंपनी,वितरकांवर गुन्हा नोंदविणार-कृषीमंत्री सोमवार, ०९ ऑक्टोंबर, २०१७
बातमी
बियाणे, कीटकनाशक कंपन्यांनी शेतकऱ्यांप्रति बांधिलकी दाखविण्याचे कृषीमंत्री फुंडकर यांचे आवाहन

मुंबई
: यवतमाळ येथील कीटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि कीटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत स्वतंत्र बैठका घेतल्या. विषबाधेच्या या घटनेमुळे शेतकऱ्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला असून शिफारस नसताना आणि गरज नसतानाही यवतमाळसारख्या भागात घातक विषारी कीटकनाशकांची विक्री झाली. यामुळे कीटकनाशक कंपनी आणि वितरकावर कायद्यानुसार फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येत असून शासकीय यंत्रणेतील दोषींवर देखील कारवाई केली जाईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीला कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, कीटकनाशक तसेत बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बियाणे आणि कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी केवळ नफा कमविणे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषीमंत्री आणि सचिवांनी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

आपण उत्पादित केलेल्या कीटकनाशकामुळे शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणावर दवाखान्यात दाखल होताहेत याबाबत माहिती घेण्याचीही गरज भासली नाही? असा संतप्त सवाल कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. फक्त आपला माल विकला गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करता शेतकऱ्यांशी सामाजिक बांधिलकीतून संवाद साधत त्यांना कीटकनाशकांच्या वापराबाबत मार्गदर्शन करणेही तितकेच आवश्यक आहे. ज्या कीटकनाशकामुळे शेतकरी बांधवांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची त्यांचे सांत्वन करण्याची आवश्यकता कंपनीला भासली नाही. फक्त व्यवसाय डोळ्यासमोर ठेवू नका सामाजिक भान देखील जपले पाहिजे, अशा शब्दात श्री. फुंडकर यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींची कानउघाडणी केली.

ज्या भागात शिफारस आणि आवश्यकता नसताना अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जाते ती तातडीने बंद झाली पाहिजे. वितरकाला आमिषे दाखवून चुकीची माहिती देऊन कीटकनाशक विक्रीस भाग पाडले जाते. त्यामुळे शेतकऱ्याची हानी होते. कृषी सेवा केंद्र, कृषी विभागातील कर्मचारी यांच्या संगनमताने अप्रमाणित कीटकनाशकांची विक्री केली जात असेल तर नुसता दंडात्मक नव्हे तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. गरज नसताना ज्या भागात गरजेपेक्षा जास्त कीटकनाशकांची विक्री झाली त्याची आता चौकशी करण्यात आहे. कीटकनाशक उत्पादक कंपन्यांनी वेळीच दखल घेऊन प्रशासनाशी संवाद साधला असता आरोग्य यंत्रणेला विषबाधेवर प्रतिकारक औषधाबाबत माहिती दिली गेली असती तर शेतकरी बांधवांचा जीव वाचविण्यात यश आले असते, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

सप्टेंबरमध्ये बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर झालेल्या बैठकीत प्रत्येक तालुक्यात बियाण्यांची माहिती, त्याचा वापर, कीटकनाशकांची फवारणी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिनिधी नेमणार होते. मात्र अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती बियाणे कंपन्यांकडून झाली नाही. बियाणे कंपन्यांनी किती ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या याची माहिती शासनाला सादर करावी, असे निर्देश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील शशिकांत शंकर रोकडे या शेतकऱ्याचा डाळींब फवारणी करताना मृत्यू झाल्याबाबत चुकीच्या बातम्या काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या वार्ताहराने कुठलीही खातरजमा न करता श्री. रोकडे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले होते. मात्र श्री. रोकडे हे जीवंत असून काल त्यांच्याशी जिल्ह्याच्या कृषी यंत्रणेने संपर्क साधून विचारपूस केली. चुकीच्या वृत्तामुळे रोकडे कुटुंबियांना मनस्ताप सहन करावा लागला असून माध्यामांनी केवळ सनसनाटी बातमीपेक्षा संवेदनशीलतेने वृत्तांकन करणे अपेक्षित होते. अशाप्रकारच्या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत श्री. रोकडे यांना दीर्घायुष्य लाभो अशा सदिच्छा कृषीमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत कृषीमंत्र्यांनी दिलेले निर्देश
  • कीटकनाशकांच्या किंमतींवर नियंत्रणासाठी कायदा करणार
  • कीटकनाशक उत्पादक कंपन्यांच्या संघटनेने जाणीव जागृतीपर मेळावे आयोजित करावेत
  • फवारणी करणाऱ्या मजुराची मोफत आरोग्य तपासणी करून त्याला सुरक्षा किट द्यावे व त्याबाबत त्याला मार्गदर्शन करावे.
  • यवतमाळ जिल्ह्यातील 1400 गावांमधील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांना कीटकनाशक व त्यात वापरलेले रसायन व त्यावरील प्रतिकारक औषध याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे.
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती येथे फलक लावून फवारणीबाबत जाणीवजागृती करावी.
  • जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून कीटकनाशकात वापरलेल्या मोल्युक्यूलबाबत माहिती द्यावी.
  • कंपन्यांनी राज्यभर जिल्हानिहाय जबाबदारी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा