महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
सार्वजनिक प्रकल्पांच्या जमीन संपादनाला मिळणार वेग; पात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी भरपाई देण्याचा निर्णय बुधवार, १६ मे, २०१८
बातमी
मंत्रिमंडळ निर्णय :

मुंबई :-
केंद्र व राज्य शासनाच्या निकडीच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढून संबंधित जमीन प्रकल्पाला तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी अशा जमिनींवरील पात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे निकडीचे सार्वजनिक प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य होणार असून प्रकल्पाचा खर्च मर्यादित राहण्यास मदत होणार आहे. तसेच, पात्र झोपडपट्टीधारकांना पक्की घरे प्राप्त होण्यासही सहाय्य होणार आहे.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनी विनाविलंब उपलब्ध करुन देताना अशा जमिनींवर असलेली अतिक्रमणे काढून संबंधित पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण अस्तित्वात नव्हते. त्यामुळे यासंदर्भातील धोरण निश्च‍िती करण्यासाठी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त, नगरविकास-२ आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा सदस्य म्हणून समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानुसार शासकीय जमिनीवरील तसेच शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार संरक्षणास पात्र अतिक्रमण धारकांना भरपाई देण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा