महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
स्वच्छ ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधांच्या विकासात बेल्जियमने सहकार्य करावे- राज्यपाल गुरुवार, ०९ नोव्हेंबर, २०१७
बातमी
हिरे उद्योग संबंधित अभ्यासक्रम विद्यापीठांतर्गत राबविण्यास मदत करावी- मुख्यमंत्री

मुंबई :
महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राजभवन, मुंबई येथे बेल्जियमचे किंग फिलिप्पे आणि क्वीन माथिल्दे यांची भेट घेतली. बेल्जियम किंग यांच्यासमवेत वरिष्ठ मंत्री व व्यवसाय प्रतिनिधीमंडळ होते. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना किंग फिलिप्पे म्हणाले, हीरे व्यापार क्षेत्रात इंडो-बेल्जियम चांगली वाणिज्यिक कामगिरी होत आहे. बेल्जियम निर्यातीचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणावर वाढले आहे. दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासठी तसेच गुंतवणुकीचा विस्तार वाढवून बेल्जियम व भारत यांच्यातील आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राज्यातील स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.

हिरे उद्योग संबंधित अभ्यासक्रम विद्यापीठांतर्गत राबविण्यास मदत करावी- मुख्यमंत्री

राज्यात हिरे उद्योगाशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ स्थापना करण्याचे संकल्पित असून यासाठी बेल्जियमने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंग फिलिप्पे यांच्याशी बोलताना म्हणाले.

राज्यातील विविध उपक्रमांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मेट्रो रेल, मोनो रेल, एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प, कोस्टल रोड, मुंबई ते नवी मुंबई सागरी लिंक, रो -रो सेवा इत्यादीसारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. मुंबई आणि उपनगरीय रेल्वे आणि बसवरील वाहतुकीचे ओझे कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी तसेच स्मार्ट सिटी मिशनची योजना राबविण्यासाठी बेल्जियमचे सहकार्य घेण्यात येईल.

किंग फिलिप्पे आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभास राज्यपाल महोदयांच्या पत्नी श्रीमती विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अर्थ, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा