महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देत पत्रकारांनी समाज माध्यमांचे आव्हान परतवून लावावे - राज्यपाल बुधवार, १० जानेवारी, २०१८
बातमी
मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण
स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :
सामान्य माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांकडे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधण्याची प्रचंड क्षमता समाज माध्यमांमध्ये आहे; मात्र याचा वापर अनेकदा चुकीची, खोटी माहिती आणि चिथावणीचा प्रसार करण्यासाठी घातक पद्धतीनेही केला जातो. याचा प्रतिकूल परिणाम सामाजिक सुसंवाद, कायदा व सुव्यवस्था आणि देशातील एकतेवर होतो. त्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी या नवमाध्यमाच्या आव्हानांना सामूहिकपणे योग्य प्रतिसाद देण्याची गरज आहे. जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करायला हवा, असे मत राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले.

मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमास पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, आमदार सर्वश्री राज पुरोहित, प्रविण दरेकर, अनंत गाडगीळ, विनायक मेटे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह विवेक भावसार आदी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यपाल पुढे म्हणाले की, लोकशाही बळकट करणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे हे पत्रकारितेचे महत्त्वपूर्ण काम आहे. पूर्वीपासूनच महाराष्ट्रात पत्रकारितेचा उच्च स्तर राखला गेला आहे. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेकांनी जनतेस स्वातंत्र्य आणि न्याय मिळण्यासाठी लेखणी चालवली. महाराष्ट्रातील पत्रकार या महान परंपरेचे वारसदार आहेत.

राज्यपाल म्हणाले की, मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाने आपल्या लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या संघातील पत्रकार हा लोकशाहीच्या विधीमंडळ आणि कार्यकारी मंडळाला जनतेशी जोडणारा दुवा आहे. आपणाकडून विधीमंडळ आणि कार्यकारी मंडळाला लोकांच्या प्रती असलेली जबाबदारीची जाणीव करुन देण्‍याचेही काम होते. वार्ताहर संघाने विद्यापीठांमधील पत्रकारिता विभागासोबत काम करण्याची गरज आहे. पत्रकारितेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला माध्यम संस्था, वृत्तपत्र किंवा वृत्त वाहिन्यांसह किमान २ वर्षांची इंटर्नशिप अनिवार्य असायला हवी.

पत्रकारिता हा संपूर्ण जगभरातील एक वाढता आव्हानात्मक व्यवसाय आहे. प्रसारमाध्यमे ही टिकून राहण्यासाठी वाढती स्पर्धा आणि घसरण होणाऱ्या महसूलाच्या समस्येला तोंड देत आहेत. आज एक हजारपेक्षा जास्त दूरचित्रवाणी वाहिन्या, ऑनलाइन वृत्त पोर्टल्स आणि हजारो व्हाट्सॲप ग्रुपवरुन बातम्या दिल्या जात आहेत. ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्याच्या स्पर्धेत साधी बातमी हरविल्याचे चित्र आज दिसून येत आहे.

सोशल मीडियाच्या आगमनानंतर आज बऱ्याचदा पत्रकारांच्या आधी आणि खात्री न केलेली बातमी लोकांपर्यंत पोहोचते. सोशल मीडिया हे लोकांच्या हाती आलेले एक शक्तिशाली शस्त्र असले तरी त्यास वेगळी किनारही आहे. सामान्य माणसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्यांकडे संपूर्ण समाजाचे लक्ष वेधण्याची प्रचंड क्षमता या माध्यमाकडे आहे.

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेने 'महाराष्ट्र पत्रकार आणि माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेच्या हानी किंवा नुकसानीस प्रतिबंध) कायदा 2017'मंजूर केला. पत्रकारितेच्या उत्तम परंपरांचा पाठपुरावा करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या स्वातंत्र्याची जपणूक करा, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

या कार्यक्रमात श्री.वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार, एबीपी माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांना राज्यस्तरीय इलेक्ट्रॉनिक मीडिया पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार आणि मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यासाठीचा पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचे संदीप आशर यांना देण्यात आला.

स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीने नुकतीच भेट घेऊन याबाबतची आपली समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात आली असून या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील पत्रकारिता अत्यंत प्रगल्भ अशी आहे. देशाच्या पत्रकारितेला दिशा देण्याचे काम राज्यातील पत्रकारितेने केले आहे. समाजात जातीयता, धर्मांधता, संकुचित वृत्तीला स्थान राहणार नाही हा दृष्टिकोन बाळगून पत्रकारांनी जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत माध्यमांना लोकभावनेचा उद्रेक होणार नाही याकडे लक्ष देत वृत्तांकन करण्याची विनंती केली होती. त्यास माध्यमांनी प्रतिसाद दिला याबद्दल माध्यमांचे त्यांनी अभिनंदन केले.

ते पुढे म्हणाले की, पत्रकारितेमध्ये विजय वैद्य यांची नि:स्पृह व रोखठोक भूमिका राहिली आहे. त्यांनी सामाजिक दृष्टिकोन ठेऊन लिखाण केले. ‘हरवलेल्या माणसांचा शोध’ या मोठ्या सामाजिक बांधिलकीच्या बाबीवर त्यांनी लिखाण केले. त्यामुळे शासन, पोलीस विभागालाही याची दखल घ्यावी लागली. पोलीस दलाने या कामासाठी वेगळा कक्ष केला. सरिता कौशिक यांनी उत्कृष्ट शोध पत्रकारिता केली आहे. श्री.सरदेशमुख यांनी मराठवाड्याच्या प्रश्नांना वेळोवेळी लेखणीद्वारे समोर आणले आहे. श्री.आशर यांनी मंत्रालय आणि विधीमंडळ कामकाजाचे उत्कृष्ट वार्तांकन केले आहे, त्याबद्दल श्री.फडणवीस यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

पत्रकारांच्या निवृत्तीवेतनाच्या प्रश्नी शासन सकारात्मक आहे अशी माहिती देखील श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी श्री.सपाटे यांनी प्रास्ताविक केले. आभार श्री.भावसार यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा