महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
समृद्धी महामार्गाची ओळख जागतिक स्तरावर होईल अशा नाविन्यपूर्ण संकल्पना स्वीकारणार - देवेंद्र फडणवीस रविवार, ०९ जुलै, २०१७
बातमी
आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेचे उद्घाटन
सुंदर व टिकावू तंत्रज्ञानासोबत बचतीला प्राधान्य
बांधकाम श्रेत्रातील प्रगत, जलद तंत्रज्ञानाचा स्वीकार


नागपूर : राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गामुळे केवळ वेळेची बचतच होणार नसून राज्यातील 24 जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. समृद्धी महामार्ग व कॅारिडोर तयार करण्यासाठी नाविण्यपूर्ण तसेच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. पूल व बोगद्यांच्या निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट रचना आणि आकर्षकते संदर्भातील आंतरराष्ट्रीय अभियंता परिषदेचे आयोजन केंद्रिय महामार्ग निर्मिती विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय पूल व अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यांच्या संघटनेमार्फत करण्यात आले आहे.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष तथा एन एच ए आयचे सदस्य डी.ओ.तावडे, आय. के. पांड्या, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ.वर्षा सुब्बाराव, आर.के.पांडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे व्यासपिठावर उपस्थित होते. आंतराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेला जागतिक स्तरावरील तज्ञ तसेच राज्याच्या विविध भागातून सुमारे 450 प्रतिनिधी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, बांधकामाच्या निर्मितीमध्ये आकर्षकता असेल तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी गेट वे ऑफ इंडिया ही मुंबई व राज्याची ओळख होती आता वरळी-वांद्रे सीलिंक ही राज्याची व मुंबईची ओळख झाली आहे. राज्याच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईत केवळ आठ ते दहा तासात पोहोचणे शक्य होणार असून हा प्रकल्प कृषी व उद्योग व विकासासाठी समृद्धी कॉरिडोर म्हणून विकसीत करण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील 24 जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग कृषी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गावरून गॅस, पेट्रोल, पेट्रोकेमिकल आदी पाईप लाईन राहणार आहेत तसेच विमान उतरण्याचीसुद्धा सुविधा असणाऱ्या या राज्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे डिझाईन हे जागतिक स्तराचे असावे यासाठी सर्व अभियांत्रिकी वास्तुविशारदांनी पुढाकार घेऊन जगातील अत्यंत सुंदर असे डिझाईन तयार करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम हा परिसंवाद नव्या भारताच्या निर्मितीला पुढे नेणारा असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाने काश्मिरला जोडणारा बोगदा तसेच ब्रम्हपुत्रेवरील सर्वात मोठा सेतू ही नवी भारताची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अव्दितीय कार्यामुळे झाली आहे.

मुंबई येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वरळी वांद्रे सीलिंक सोबत वांद्रे ते वर्सोवा नवीन सीलिंक तयार करण्यात येणार असल्याचे सांगताना ते म्हणाले की नरीमन पॉईंट ते वरळी समुद्री मार्ग, ट्रान्स हार्बर सीलिंकचे बांधकाम करताना सुरक्षा, सुंदरता व टिकावूपणा याला प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

देशातील रस्ते विकासासोबत पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली असून, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

प्रारंभी एनएचएआयचे सदस्य व एआयबीएसईचे अध्यक्ष डी. ओ. तावडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेच्या आयोजनाबाबत सांगताना बांधकामाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन तसेच नवनिर्मितीमध्ये गुणवत्ता, दर्जा व सौंदर्य यावर विशेष भर देऊन महामार्गाची निर्मिती करताना जगातील पर्यटकांना आकर्षित करणारे पूल व बोगदे तयार करण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होत असल्याचे सांगितले.

अखिल भारतीय अभियांत्रिकी संघटनेतर्फे नितीन गडकरी यांनी अभियांत्रिकी कौशल्याला सुवर्णकाळ मिळवून दिल्याबद्दल देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले.

आभार संघटनेचे प्रमुख आय. के. पांडे यांनी मांडले. यावेळी महापौर श्रीमती नंदाताई जिचकार युरोपसह विविध देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा