महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
'स्कील सखी' योजनेद्वारे 1 लाख ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७
बातमी
मुंबई : महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. 'स्कील सखी' योजनेद्वारे 1 लाख ग्रामीण महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी शासन काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

द न्यू इंडिया एक्सप्रेस ग्रुपच्या द संडे स्टॅंडर्ड मार्फत देवी अवॉर्ड्स मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल आयटीसी येथे प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या दहा महिलांना  पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमास द न्यू इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संपादक- संचालक प्रभू चावला, व्यवस्थापकीय संपादक शंपा कामत आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, इतिहासात जेव्हा जेव्हा महिलांना आदराचे स्थान दिले गेले तेव्हा समाजाची प्रगती झाल्याचे दिसून आले आहे. समाजातील हे निम्मे मनुष्यबळ योग्य पद्धतीने वापरले गेल्यास समाजाची, देशाची प्रगती निश्चितच होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात महिला शेतीच्या कामात खूप कष्ट करतात, मात्र त्यांच्या नावावर जमीन असण्याचे प्रमाण खूप कमी आहे.

महिला सर्व क्षेत्रात आज पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी द न्यू इंडियन एक्सप्रेस समुहाने सुरू केलेला हा देवी अवॉर्डचा उपक्रम अभिनंदनीय आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, डिझाईनर दिव्या ठाकूर, महिला हक्क कार्यकर्त्या मुमताज शेख, अभिनेत्री क्रीती कुल्हारी, आर्थिक क्षेत्रातील राखी कपूर, बालकांसाठी चळवळ मधील कार्यकर्त्या रेणू गावस्कर, सामाजिक कार्यकर्त्या रॉबिन चौरासिया, न्यूट्रिशन एक्स्पर्ट ऋजुता दिवेकर, नाट्य व चित्रपट कलावंत शुभांगी गोखले यांच्यासह मेळघाटात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्मिता कोल्हे यांना पुरस्कार देण्यात आला. प्रास्ताविक श्री. चावला यांनी केले, स्वागत श्रीमती शंपा कामत यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा