महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
कोळसा पुरवठा, वीज निर्मिती पूर्वपदावर आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश शनिवार, ०७ ऑक्टोंबर, २०१७
बातमी
मुंबई : कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम होऊन राज्यात काही भागात भारनियमन करावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोळसा पुरवठा आणि वीज निर्मिती पूर्वपदावर आणून येत्या 7 दिवसात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भातील सूचना दिल्या.

ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सहसचिव आर. के. सिन्हा, महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार , महाकोल इंडिया लि. चे संचालक (मार्केटिंग) एस. एन. प्रसाद, वेस्टर्न कोल फिल्डचे व्यवस्थापकीय संचालक आर. आर. मिश्रा, रेल्वे मंत्रालयाचे ए. के. गुप्ता, मुंबई येथील महाव्यवस्थापक (ऑपरेशन) अजित कुमार जैन आदी उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने त्याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. परिणामी काही भागात भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एकूणच कोळसा उत्पादन, त्याची वीज प्रकल्पापर्यंतची वाहतूक असा समग्र आढावा आज मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोळशाचा पुरवठा तत्काळ सामान्य करून तो वीज प्रकल्पांपर्यंत नियमित स्वरूपात कसा पोहोचेल, यासाठी उचित दिशानिर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. कुठल्याही स्थितीत येत्या 5 ते 6 दिवसात वीज निर्मिती पूर्वपदावर येईल आणि सर्वसामान्यांना भारनियमनाचा त्रास होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

गरज भासल्यास कोळशाची काही वाहतूक रस्त्याने सुद्धा करा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. रेल्वेने सुद्धा या काळात अतिरिक्त व्यवस्था उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा