महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातील अहवाल नोव्हेंबरपर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश शनिवार, ११ मार्च, २०१७
बातमी
मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्त्वाखाली विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आरक्षणासंदर्भात टाटा समाज विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासाच्या प्रगतीचा आढावा घेऊन हा अभ्यास अहवाल टाटा समाज विज्ञान संस्थेने येत्या नोव्हेंबरपर्यंत शासनाकडे पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.

खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आज धनगर समाजातील
विविध संघटनासह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अहवाल लवकर देण्याचे निर्देश संबंधित संस्थेला दिले. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त नरेंद्र पोयाम, टाटा समाज विज्ञान संस्थेतील सहयोगी प्राध्यापक शैलेंद्रकुमार धारोवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात विविध पुरावे गोळा करून सखोल अहवाल करण्यासाठी टाटा समाज विज्ञान संस्थेने काम सुरू केले आहे. या सर्वेक्षण व इतर अभ्यासातून तयार झालेला अहवाल राज्य शासनास हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी नोव्हेंबरपर्यंत देण्यात यावा. त्यानंतर राज्य शासन पुढील कार्यवाही करेल.

यावेळी प्रा. धारोवार यांनी आतापर्यंत संस्थेने केलेल्या अभ्यासाचा व सर्वेक्षणाचा आढावा सादर केला. डॉ. महात्मे यांनी या अभ्यासावर समाधान व्यक्त करून अहवाल तातडीने देण्याची विनंती केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा