महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
दुग्ध विकास प्रकल्पाचे संपूर्ण नियंत्रण डिजीटल पद्धतीने करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७
बातमी
मुंबई : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने विदर्भ व मराठवाडा भागात राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे नियंत्रण डिजीटल पद्धतीने करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या प्रकल्पाची आढावा बैठक आज समिती कक्ष मंत्रालयात घेण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष दिलीप रथ, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल व पशुसंवर्धन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मराठवाडा व विदर्भातील तीन हजार तेवीस गावांमध्ये राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना करण्यात आले. या प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी प्रकल्प संचालक व इतर अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्यात यावी. तसेच विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागात दुग्ध विकासासाठी पशुंची संख्या वाढविण्यात यावी. नव्याने चांगल्या जातीची दुधाळ जनावरे आदिवासी क्षेत्रात उपलब्ध करुन दुग्ध व्यवसाय वाढीसाठी नियोजन करावे.

दुग्ध विकास प्रकल्प सुरु असलेल्या तीन हजार तेवीस गावांचा विस्तृत आराखडा डिजीटल करण्यात यावा. पारदर्शक पद्धतीने हा प्रकल्प झाला पाहिजे. दुधाळ जनावरांची संख्या, गाई-म्हशींचे प्रजोत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना, चाऱ्यासाठी आवश्यक ती पिके, चारासाठा, पशुंच्या संख्येच्या तुलनेत चाऱ्याची उपलब्धता या बाबींचे सुक्ष्म नियोजन करुन गावनिहाय आराखडा या प्रकल्पाचे पुढील बैठकीत डिजीटल प्लॅटफॉर्मवर सादरीकरण करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मदर डेअरी फ्रूट अँन्ड व्हेजिटेबल प्रा.लि. यांचे सदस्य व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यात भाडेपट्टा करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा