महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी दोन कोटींचा निधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
बातमी
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ

उस्मानाबाद :
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम यमगरवाडी येथील भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या एकलव्य विद्या संकुलामार्फत करण्यात येत आहे. या प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी येथील एकलव्य विद्या संकुल येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी वर्ष सांगता समारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, लाहिरी गुरूजी, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचा संकल्प या प्रतिष्ठानने केला आहे. शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य धारेत आणण्याचे काम या प्रकल्पाने केले आहे. ज्या-ज्या वेळी आपल्या देशात परकीयांची सत्ता आली, तेव्हा या भटक्या विमुक्तांनी आपली संस्कृती आणि लोककला जपण्याचेही काम केले. या भटक्या विमुक्त्‍ा समाजाकडे असलेल्या परंपरागत कौशल्य आणि लोककलांना आधुनिकतेची जोड देऊन त्याचे ब्रँडिंग करुन लोककला आणि कौशल्य वैश्विक स्तरावर पोहोचविण्याचे काम श्री विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून केले जाईल. सध्या देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आणि संविधानाच्या माध्यमातून संविधानिक व्यवस्था निर्माण करुन या समाजातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रकल्प नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाकडून या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या संस्थेच्या प्रलंबित मागण्या राज्यस्तरावर पोहोचवून त्या पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच काही मागण्यांबाबत राज्य शासनाला धोरणात्मक आणि कायदेशीर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी भटक्या-विमुक्त मंत्रालयातर्फे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच कोटी रुपयांची मदत करणार : नितीन गडकरी

श्री.गडकरी यावेळी म्हणाले, जातीविरहीत समाज संघटन करण्याचा संघाचा विचार आहे, भटके विमुक्त समाजाच्या विकासाचा मार्ग 21 व्या शतकाकडे जायचा असेल तर ज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. कौशल्य विकास आणि त्याचे शिक्षण ही काळाची गरज आहे. हेच कौशल्य शिक्षण भटके विमुक्त समाजाला दिले तरच त्यांची प्रगती होऊ शकेल, यातूनच हजारो तरुणांना रोजगार मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भटके विमुक्तांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान ही संस्था त्यांच्यामागे खंबीरपणे उभी आहे. शोषित, वंचित, पीडित समाजावर विकासात्मक संस्कार करीत रोजगार देण्यासाठी ही संस्था काम करीत आहे, हेच खरे समाज परिवर्तनाचे काम आहे, असे सांगून श्री.गडकरी यांनी या संस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या औद्योगिक, सामाजिक दायित्व (सीएसआर) फंडातून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी लाहिरी गुरुजी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांचीही समयोचित भाषणे झाली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनिक तरूण भारत व साप्ताहिक उस्मानाबाद समाचार या वृत्तपत्रांच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांना अनुलोम सन्मित्र पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

मान्यवरांच्या स्वागतानंतर भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ यांनी प्रतिष्ठानच्या वाटचालीबाबत प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता उमाकांत मिटकरी आणि तन्वी तोतडे व शर्विल आडे या विद्यार्थ्यांनी केले तर आभार रावसाहेब कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप एकात्मता मंत्राने करण्यात आला.

या कार्यक्रमास गिरीश प्रभुणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, ॲड.अनिल काळे, ॲड.मिलिंद पाटील, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष चद्रकांत गडेकर, महादेवराव गायकवाड, डॉ.अभय शहापूरकर, भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह नरसिंग झरे, रौप्य महोत्सवी वर्ष संचलन समितीचे अध्यक्ष डॉ.संजय पुरी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा