महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, ०५ सप्टेंबर, २०१७
बातमी
मुंबई : महाराष्ट्र हे विविध संस्कृतीने नटलेले राज्य असून गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देश पातळीवर साजरा होत असलेल्या गणेशोत्सवाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडिग करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन कार्यक्रमास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी मुख्यमंत्र्यानी केली. थायलंडच्या नागरिकांसमवेत मुख्यमंत्र्यानी सपत्निक गणेश आरती केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्व परदेशी गणेश भक्तांचे स्वागत करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही देशात गेले तरी गणेशाची मुर्ती आपल्यास पाहायला मिळते. चीन, अमेरिका, युरोप, थायलंड, मलेशिया आदी देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय, ही कौतुकाची बाब आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी राज्याचा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्न करीत आहेत.मुख्यमंत्री श्री, फडणवीस यांनी थायलंडच्या पाहुण्यांचे कौतुक केले, त्यांनी केलेल्या गणेश आरतीने मुख्यमंत्री भावूक झाले. तसेच मुख्यमंत्र्यानी विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश मुर्तींवर पुष्पवृष्टी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पदुम मंत्री महादेव जानकर, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राज पुरोहित, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, मनपा आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा