महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
बाबासाहेबांचे आर्थिक समानतेचे विचार डिजीटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारतील- प्रधानमंत्री शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७
बातमी
  • प्रधानमंत्र्यांच्याहस्ते विविध योजना, उपक्रमांचे लोकार्पण
  • डिजीटल व्यवहारासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन
  • कॅशलेस व्यवहार ; भ्रष्टाचार व काळेधनाच्या सफाईचे अभियान
  • आयआयआयटी, आयआयएम, एम्स इमारतीचे भूमीपूजन

नागपूर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला सन्मानाचे जीवन देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. सर्वांना समान आर्थिक अधिकार देण्याचे त्यांचे विचार होते. त्यांचा हा विचार इतक्या वर्षात रुजू शकला नाही. डिजीटल इंडिया ही मोहीम त्यांचा हा विचार प्रत्यक्षात साकारेल, असे प्रतिपादन त्यांच्या जयंतीदिनी नागपूर येथे अभिवादन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

नागपूर येथील मानकापूर विभागीय क्रीडा संकूल येथे निती आयोगाने ‘नवी अर्थ व्यवस्था आणि नवभारत’ या उपक्रामाचे राष्ट्रव्यापी आयोजन केले होते. याठिकाणी प्रधानमंत्र्यांच्याहस्ते विविध योजना व उपक्रमांचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद, मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर, ऊर्जा मंत्री पियुष गोयल (स्वतंत्र प्रभार), गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, खा. कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. यावेळी सभागृहातील नागरिकांनी टाळयांचा प्रचंड कडकडाट केला. त्यांच्या मराठी प्रेमाला दाद दिली. बाबासाहेबांच्या जंयतीदिनी दीक्षाभूमीच्या पवित्र धरतीवर नमन करता आले. दीक्षाभूमीची ऊर्जा, प्रेरणा सदैव सोबत राहील. बाबासाहेबांनी दलित, पिडीत, शोषित, वंचितांसाठी काम केले. या घटकाच्या सर्व प्रश्नांचे उत्तर त्यांनी संविधानाच्या स्वरुपात दिले आहे. यामुळे प्रत्येकाला आपल्या जिवनात सकारात्मक कार्य करण्याचे संधी व प्रेरणा मिळत आहेत, असे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

बाबासाहेबांचे सामाजिक, आर्थिक विचार डिजीटल इंडियाच्या माध्यमातून साकारणार आहे. भिम ॲप त्यासाठी चांगले माध्यम आहे. या ॲपच्या माध्यमातून खिश्यात एक पैसाही न बाळगता आर्थिक व्यवहार करता येईल. कॅशलेस व्यवहाराची ही टेक्नालॉजी विश्वात लोकप्रिय ठरेल. डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी डिजीधन ही योजना राबविली जात आहेत. देशभरात 100 ठिकाणी डिजीधन मेळावे घेण्यात आले. भ्रष्टाचार, काळेधन संपविण्यासाठी डिजीधन हे सफाई अभियान ठरणार आहे. यासाठी देशातील युवकांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कॅशलेस व्यवहारासाठी भिम आधार हे ॲप क्रांतीकारी ठरणार असून व्यापारी व ग्राहकांना या ॲपचा अधिकाधिक वापर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. येत्या उन्हाळी सुट्या यासाठी घालवाव्या. यातून आर्थिक उत्पन्नही मिळणार आहेत. 14 ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे. परिवर्तनाचे शिपाई बनावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केले.

केंद्र शासनांच्या योजनांची महाराष्ट्र हे उत्तम अंमलबाजवणी करणारे राज्य आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत विकासासाठी सोबत पुढे जावू, असे प्रधानमंत्री म्हणाले. नागपूर येथे लोकार्पण करण्यात आलेल्या कोराडी प्रकल्पाच्या वापरासाठी शहराने भांडेवाडी येथे सांडपाण्यावर प्रकिया करुन उपलब्ध करुन दिले आहे. हा पर्यावरणपूरक प्रयोग आहे. असे सांगत त्यांनी नागपूरकरांचेही अभिनंदन केले. वीज जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहे. वीज प्रत्येकाचा हक्क झाली आहे. देशाला प्रगतीच्या शिखरावर जायचे असल्यास विजेशिवाय पर्याय नाही. वीज उत्पादनासोबत अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प हे देशात मोठया प्रमाणात उभे राहत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यातील 42 हजार घरे बांधण्याचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांच्याहस्ते झाला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही अनेकांकडे अजूनही स्वत:चे घर नाही. देशवासियांनी योगदानाचा संकल्प केल्यास येत्या 2022 पर्यंत प्रत्येकाला स्वत:चे घर उपलब्ध होतील. सर्वांनी मिळून गरीबांचे दु:ख दूर करु. गरीबांना घरे देतांनाच रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत. 21 वे शतक ज्ञानाचे शतक आहे. भारताला विश्वाचे नेतृत्व करण्याचे संधी आहे. नागपूर येथे सुरु करण्यात आलेल्या संस्था युवकांना यासाठी संधी देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठीतून भाषणाची सुरुवात

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ‘धम्मचक्र प्रवर्तनाचे कार्य ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले त्या भूमीला माझा प्रणाम. काशी प्राचिन ज्ञान नगरी आहे. नागपूर बनू शकते का ?’, अशी मराठीतून सुरुवात करताच होय या उत्तरासोबत टाळयांचा प्रचंड कडकडाट झाला. या कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले.

बाबासाहेबांचे आर्थिक विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

गरीबाच्या कल्याणाचा अजेंडा राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार कृतीत आणण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सामान्य नागरिकांना सशक्त बनविण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत. प्रधान मंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेले भिम आधार ही योजना संपूर्ण देशात गेम चेंजर ठरेल. आर्थिक समावेशक पारदर्शकता येण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून राज्यांनीही जबाबदारी पारपाडणे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने नागपूर जिल्हयात शंभर गावात भिम आधारच्या माध्यमातून व्यवहार सुरु करण्यात आले आहेत. येणाऱ्या एक महिन्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आधार व पीओएस मशीनने जोडल्या जाणार आहेत. यासाठी चांगली व्यवस्था उभी करु. राज्यातील पंधरा हजार ग्रामपंचायती लवकरच डिजीटल होतील. डिसेंबर-2018 पर्यंत प्रत्येक गावात भारतनेटच्या माध्यमातून फायबर यंत्रणा पोहचवू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात 21 शहरात 42 हजार घरांचा शुभारंभ करण्यात आला. प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात आलेले घरांचे उद्दिष्ट पूर्ण करुन प्रत्येक महिन्यात घरांची संख्या वाढवू. गेल्या कितेक वर्षात बांधण्यात आलेली नाहीत त्यापेक्षा म्हणजे 2 लाख 50 हजार घरांचे बांधकाम राज्यात सुरु आहे. भिम ॲपच्या शुभारंभासाठी प्रधानमंत्र्यांनी नागपूर शहराची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

डिजीटल व्यवहाराने मोठे परिवर्तन घडविले – नितीन गडकरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समानतेचे विचार पुढे नेण्याचा संकल्प प्रधान मंत्र्यांनी केला आहे. गाव, गरीब, मजूर यांचे जीवनमान सुकर झाले पाहिजे. त्यासाठीच डिजीटल इंडिया ही योजना आहे. या योजनेने देशात मोठे परिवर्तन घडविले असून बाबासाहेबांचे आर्थिक विचार योजनेतून पूर्ण होत आहेत. जीएसटी व डिजीटल इंडियामुळे देशाच्या महसूलात वाढ होणार आहे. या महसूलाचा पायाभूत सुविधांचा उभारणी सोबतच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध होईल. स्वच्छ व प्रदुषणमुक्त भारताचे स्वप्नही पूर्ण होणार आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून नागपूर ऐज्युकेशनल हब होत आहे. सिम्बायसिस सारखे संस्था 450 कोटी रुपये खर्च करुन शैक्षणिक सुविधा उभ्या करीत आहेत. केंद्राच्या विविध योजनांना नागपूर जिल्हयाच्या उत्तम सहभाग मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडणार – रविशंकर प्रसाद

डिजीटल इंडिया व कॅशलेसची मोहिम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायतींना सक्षम करणे आवश्यक आहे. येत्या काळात देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबरने जोडणार असल्याचे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी नागपूरात होत असलेला शुभारंभाचा हा सोहळा देशाच्या इतिहासातील मोठा दिवस ठरणार आहे. डिजीटल इंडियाला प्रोत्साहन दिल्यानंतर गेल्या काही काळात 28 कोटी नवीन बँक खाती उघडण्यात आली. 113 कोटी आधार नोंदणी झाली. 108 मोबाईल कंपन्या देशात आल्या. इनटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 50 कोटीवर गेली. 35 कोटी स्मार्टफोनचा नागरिकांकडून वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. डिजीटल व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना 197 कोटीचे रुपयाचे पुरस्कार देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी नागपूर येथे 20 हजार स्क्वेअरफुट जागेवर भव्य माहिती केंद्र उभारले जाणार असल्याची घोषणा केली.

विविध योजना, उपक्रमांचे लोकार्पण, भूमीपूजन

प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मानकापूर येथे विभागीय क्रीडा संकुलात विविध योजना तथा उपक्रमांचे लोकार्पण व भूमिपूजन यांत्रिक कळ दाबून झाले. तर भीम आधार ॲपचे उद्घाटन मोठया टच स्क्रीनला अंगठा लाऊन केले. कोराडी येथे 1980 मेगावॅटच्या प्रकल्पाचे त्यांनी लोकार्पण केले. आयआयआयटी, आयआयएम व एम्सच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या नागपुरातील इमारतीचे भूमीपूजनही त्यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांसाठी 21 शहरात 42 हजार घरे बांधण्यात येणार असून त्याचा शुभारंभही प्रधानमंत्र्यांनी केला. डाक विभागाच्या वतीने दीक्षाभूमीवरील विशेष दोन टपाल टिकीटांचे विमोचन करण्यात आले. भिम आधार योजनेचा शुभारंभ तसेच भिम ॲप अंतर्गत रेफरल व कॅशबॅक योजनांचा शुभारंभही त्यांनी केला. डिजीधन व्यापार योजना व लकी ग्राहक योजनेअंतर्गत पारितोषिके जाहिर झालेल्या व्यापारी व ग्राहकांना पारितोषिकांचे वितरणही प्रधानमंत्र्यांनी केले. तसेच 75 रोख विरहीत शहरांचा विकास करण्याचे जाहीर केले.

डिजीधन व्यापार योजनेअंतर्गत प्रथम 50 लाखाचा पुरस्कार तामिळनाडू येथील राधाकृष्णन, द्वितीय 25 लाखाचा पुरस्कार रागिनी राजेंद्र उत्तेकर यांना तर तृतीय पुरस्कार 12 लाखाचा पुरस्कार हैदराबाद येथील शेख रफी यांना देण्यात आला. लकी ग्राहक योजनेअंतर्गत एक कोटी रुपयाचा प्रथम पुरस्कार लातूर येथील श्रध्दा मेंगशेट्टी, द्वितीय 50 लाखाचा पुरस्कार गुजरात येथील हार्दीक प्रजापती, तर तृतीय 25 लाखाचा पुरस्कार डेहारादून येथील भरत सिंग यांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.

विभागीय क्रीडा संकूल येथे झालेल्या या अविस्मरणीय सोहळयाला नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा