महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
नव्या पिढीच्या नाविण्यपूर्ण कल्पना कार्यक्षम सुशासनासाठी उपयुक्त - मुख्यमंत्री फडणवीस शनिवार, ०५ ऑगस्ट, २०१७
बातमी
'सीएम फेलोशिप प्रोग्राम'अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांशी (फेलोज) वर्षा निवासस्थानी संवाद

मुंबई :
'सीएम फेलोशिप प्रोग्राम'अंतर्गत नव्या पिढीच्या नाविण्यपूर्ण कल्पना, सूचनांचा उपयोग कार्यक्षमतेने सुशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'सीएम फेलोशिप प्रोग्राम'अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांशी (फेलोज) वर्षा निवासस्थानी संवाद साधताना ते बोलत होते.
'सीएम फेलोशिप प्रोग्राम' अंतर्गतच्या दुसऱ्या वर्गाचा प्रशिक्षण कालावधी संपत आल्याने या प्रशिक्षणार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागाचे संचालक आर. आर. शिंगे उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी डिजीधन योजनेबाबत जनजागृती, स्टार्ट-अप धोरण, शासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विविध विषयांवर सादरीकरण केले. आरोग्य, शिक्षण, पाणी, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण रक्षण, हवामान बदल, न्याय आदी क्षेत्रामध्ये शासनाने खासगी संस्थांशी भागीदारी करावी, असेही मत प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले, नवीन कल्पना स्वीकारणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी काही प्रमाणात अडचणी येतात. मात्र, एकदा का त्यांची उपयुक्तता पटवून देता आली की पुढील काम सोपे होते. डिजीटल यंत्रणांचा वापर तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये डिजीटल पद्धतीचा वापर कमी होऊ नये यासाठी सातत्याने शासन प्रयत्नशील राहील. राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकाधिक सक्षम करण्यास प्राधान्य दिले जात असून ई- प्रशासनाचा गतीमान वापर करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जनतेनेही माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

डिजीआयपीआर उपयोग करत असलेल्या ‘फ्लॉक’ संवाद माध्यमाचे कौतुक

नितुल शाह यांनी शासनामधील प्रत्येक विभागात अंतर्गत संवाद माध्यमाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून (डीजीआयपीआर) ‘फ्लॉक’ या गटांतर्गत माध्यमाचा उपयोग कार्यक्षमतेने केला जातो याची माहिती देऊन महासंचालनालयाचे कौतुक केले.तसेच शासनांतर्गत संवादमाध्यम, पुढील घटनांचा अंदाज घेत स्वयंप्रेरणेने माहितीचे प्रसारण, शासनाच्या संकेतस्थळांची आकर्षकता आणि गतीमानता वाढविणे आदी बाबींबाबत सादरीकरण केले.

कीर्ती खंडेलवाल यांनी डिजीधन जनजागृतीबाबत शेवटच्या स्तरापर्यंत झालेले काम आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कॅशलेस पद्धतीस प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल याबाबत सादरीकरण केले. तन्मय पै आणि उमेश बलवाणी यांनी महाराष्ट्रात स्टार्टअप पॉलिसीअंतर्गत अधिक स्टार्टअप सुरु व्हावेत यासाठी ‘इनक्युबेटर्स’ची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली.

शेवटी मुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून भविष्यातील संकल्पनांबाबत माहिती घेतली. यावर प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशासकीय सेवा, समाजकार्य, आर्थिक सेवा, राजकारणा या क्षेत्रातील संधी आजमावणार असल्याचे सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा