महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, १५ जुलै, २०१७
बातमी
इइएसएल (एनर्जी इफिसिंएनसी सविर्सेस लिमिटेड) आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार

मुंबई :
राज्यातील ज्या ग्रामीण भागामध्ये गावठाण व कृषी वाहिनीचे विलगीकरण झाले आहे अशा ठिकाणी सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करण्‍यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना महत्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सौर कृषी वाहिनी योजनेबाबतचा आढावा मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा या निवासस्थानी घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के.जैन, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आदि उपस्थित होते.

सोलार पार्कमधून लिफ्ट इरिगेशनसाठी वीज घेण्याबाबतचा प्रकल्प अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश श्री.फडणवीस यांनी यावेळी दिले. महावितरणच्या समस्या तसेच केंद्राकडे प्रलंबित असलेल्या ऊर्जा विभागाच्या विविध बाबींचे यावेळी संगणकीय सादरीकरण करण्यात आले.

इइएसएल (एनर्जी इफिसिंएनसी सविर्सेस लिमिटेड) आणि महावितरण यांच्यात सामंजस्य करार

इइएसएल (एनर्जी इफिसिंएनसी सविर्सेस लिमिटेड) आणि महावितरण यांच्यात यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत इइएसएलमार्फत सौर ऊर्जा पंप पुरविण्यात येणार आहेत. सुरुवातीला हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे. या करारावर महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व इइएसएलतर्फे सौरव कुमार यांनी मुख्यमंत्री व केंद्रिय राज्यमंत्री तसेच उर्जामंत्री यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.

येत्या सहा महिन्यात राज्यातील आदिवासी भागातील दहा लाख घरात वीज पोहोचविण्यासाठी केंद्र शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल. केंद्राकडे प्रलंबित असलेल्या ऊर्जा विभागाच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यात येतील, असे श्री.गोयल यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा