महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
भाऊसाहेब फुंडकरांच्या संसदीय कार्याविषयी ग्रंथ निर्मिती करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, ०७ जून, २०१८
बातमी
सर्वपक्षीय श्रध्दांजली सभा
शेतकऱ्यांप्रती कणव, कृषी-सहकार क्षेत्रातील दूरदर्शी नेता हरपला

मुंबई :-
भाऊसाहेब फुंडकर हे शेतकऱ्यांप्रती प्रचंड कणव असणारे नेते होते. त्यांच्या निधनामुळे कृषी - सहकार क्षेत्रातला दूरदर्शी नेता हरपला, अशा शब्दात आज येथे दिवंगत कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना आज येथे सर्वपक्षीयांच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणच्या सभागृहात श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या संसदीय कार्य मंडळाच्यावतीने दिवंगत फुंडकर यांच्या संसदीय कार्याला समर्पित ग्रंथ निर्मिती करण्यात येईल, असे सांगितले.

श्रध्दांजली सभेस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, परिवहन मंत्री दिवाकर रावते, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रावसाहेब दानवे, आमदार आकाश फुंडकर, आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळा नांदगांवकर यांच्यासह फुंडकर परिवारातील सदस्यही उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भाऊसाहेब एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडणारे व्यक्तिमत्त्व होते. ते मंत्रीमंडळातील आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्याकडे प्रचंड मोठा राजकीय सामाजिक अनुभव होता. शेतकऱ्यांप्रती त्यांना प्रचंड कणव होती. त्यामुळेच त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाने आणि जन्मभर शेतकऱ्यांसाठी काम केलेल्या कार्यकर्त्याला कृषीमंत्री म्हणून स्थान मिळाले.

राज्याचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी विविध कामे हाती घेतली. त्यांनी राज्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी यशस्वीपणे राबविले. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेते गुणात्मक आणि मोठी वाढ झाली. भाऊसाहेबांचे जीवन एका विचाराला समर्पित होते. त्यामुळे पक्ष, संघटना पातळीवरही विचार परिवारातील सर्व कार्यकर्त्यांना, संघटनांना भाऊसाहेबांचा हक्काचा आधार होता. विरोधी पक्षनेते असताना आक्रमता होती पण आक्रस्ताळेपणा नव्हता. त्यामुळेच भुमिका मांडताना, त्यांनी व्यक्तीगत टीका केली नाही. भुमिकेशी प्रामाणिक होते. त्यामुळे ते विरोधकांशी राजकीय विरोधक म्हणून वागले.

जमिनीशी जोडलेला नेता म्हणून भाऊसाहेबांचे विधानमंडळातील कर्तृत्व लोकांसमोर यावे यासाठी राष्ट्रकुल संसदीय कार्यमंडळाच्यावतीने ग्रंथ तयार करण्यात यावा. त्यासाठी सर्वांनी आपल्याकडील संदर्भांचे योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, शेतकरी वर्गाबाबतच्या व्यथा त्यांच्या प्रत्येक शब्दातून सभागृहात मांडल्या जात असत. विदर्भात त्यांनी सहकार क्षेत्रात मोठे काम केले. राजकारणात कटूताही सहजपणे येते, पण त्याचा स्पर्शही भाऊसाहेबांच्या वर्तनात नव्हता. शांततेने लोक जिंकणारा, दुसऱ्याच्या हृदयात जाणारा, स्वतःचे विचार न सोडणारे असे भाऊसाहेब होते. श्री. नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्यावतीनेही दिवंगत फुंडकर यांना श्रद्धांजली वाहिली.
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची ते अतिशय पोटतिडकीने मांडणी करत असत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते खूप जागरूक होते. कापूस उत्पादकांसाठी काढलेली पदयात्रा लक्षवेधी ठरली. शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे असे नेते म्हणून त्यांचे काम नेहमीच स्मरणात राहील.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, शेतकरी, दलित, कष्टकरी, शेतमजूर यांच्याप्रती भाऊसाहेबांनी नेहमीच संवेदनशीलपणे काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रतीही त्यांना मोठा आदर होता. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात उत्कृष्ट संसदपटू काम करणाऱ्या भाऊसाहेबांना मुकलो आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, फुंडकर हे शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे असे नेते होते. सभागृहात ते विषयांची मांडणीही अभ्यासपूर्णरित्या करत असत. शेतीच्या प्रश्नांबाबत त्यांनी सभागृहात प्रभावीपणे आणि संयमीपणे मांडणी केली. पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या समस्यांकरिता समर्पितपणे काम केले. ते अजातशत्रू होते.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत भाऊसाहेब आणि दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे नातेसंबंध घट्ट असे होते. ज्येष्ठत्त्वाचे मार्गदर्शन करणारे, पहिल्या फळीतील नेते आपल्यात राहिलेले नाही. त्यांचा समर्पित, शांत आणि संयमी स्वभाव स्मरणात राहील.

खासदार श्री. दानवे म्हणाले, विरोधी पक्षात काम करताना भाऊसाहेबांनी खामगाव ते आमगाव अशी साडेतीनशे किलोमीटर्सची पदयात्रा काढून सरकारला शेतीच्या प्रश्नांची दखल घेण्यास भाग पाडले. अत्यंत उमदा आणि चांगला नेता आपल्यातून गेला. लोकांमध्ये लोकप्रिय असलेला आणि कोणताही गर्व नसलेले असे ते नेते होते.

माजी आमदार श्री. नांदगावकर म्हणाले, सामान्य लोकांचा आवाज म्हणून त्यांनी काम केले. कर्तृत्वान माणूस हरपला. सहकार, कृषी हे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. आमदार श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात काम करणारे, शेतकऱ्यांच्या बाजुने बोलणारे, लढणारे असे ते नेते होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लढणारा एक प्रभावी संसदपटू हरपला आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील काम नेहमीच स्मरणात राहील.

परिवहन मंत्री श्री. रावते यांनी आदरांजली वाहिली. ते म्हणाले, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांशी जवळचा नाते असणारा कार्यकर्ता गेला. दिवंगत भाऊसाहेबांनी त्या काळी मांडलेल्या कृषी क्षेत्रातील संकल्पना आज महत्त्वाच्या ठरू लागल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांसाठी आत्मियतेने काम करणारे कृषीमंत्री होते. शेतकरी दुष्काळाच्या गर्तेतून बाहेर यावा, त्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळावे यासाठी ते सातत्याने कार्यशील राहिले.

सुरूवातीला दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजलीने श्रध्दांजली अर्पण केली. दिवंगत भाऊसाहेबांचा जीवनपट उलगडणारी ध्वनी-चित्रफितही यावेळी दाखविण्यात आली. श्रद्धांजली सभेस विविध पक्ष, संघटना, संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा