महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्यातील विकास प्रकल्पांच्या वित्तीय सहायासाठीची प्रक्रिया आशियाई विकास बँकेने तातडीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
बातमी
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड ॲन्युइटी मॉडेलद्वारे (HAM) करण्यात येणारे रस्ते विकास प्रकल्प, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि कृषी पंपांसाठी उच्चदाब वितरण प्रणाली या योजनांसाठी आशियाई विकास बँकेने वित्तीय सहाय करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच संबंधित विभागांनीही या प्रकल्पांची कामे लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आज आशियाई विकास बँकेच्या प्रतिनिधींबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी बँकेच्यावतीने वित्त सहाय करण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यूपीएस मदान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, आशियाई विकास बँकेचे भारतातील संचालक केनीची योकोयमा, उपसंचालक सब्यासाची मित्रा, वरिष्ठ ग्राम विकास तज्ज्ञ ली मिंग ताई, ऊर्जा विभाग तज्ज्ञ लीन जॉर्ज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी रस्ते विकास प्रकल्प तसेच कृषी पंपांसाठी वीजपुरवठा या योजना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण होण्यासाठी आशियाई बँकेने लवकरात लवकर वित्तीय सहाय्य करावे. या प्रकल्पांची कामांचा वेग वाढविण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत.

श्री. योकोयामा यांनी राज्याच्या तिनही प्रकल्पांना वित्त सहाय करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या प्रकल्पांच्या वित्त सहायसंबंधीच्या प्रस्तावांना केंद्र शासनाने तत्वतः मंजुरी दिली आहे. बँकेच्या मुख्यालयाकडून वित्त पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा