महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी धोरण तयार करणार - मुख्यमंत्री रविवार, ०३ डिसेंबर, २०१७
बातमी
 मुख्यमंत्र्यांचा अफरोज शाह यांच्या स्वच्छता मोहीमेत सहभाग

मुंबई : वर्सोवा बीच येथे अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आज मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याची सर्वांगीण स्वच्छता आणि संवर्धन यासंदर्भातील धोरण तयार करण्याबाबत अफरोज शाह हे काम करीत आहेत. या धोरणाचा मसुदा ते लवकरच राज्य शासनाला देणार असून त्यावर अजून संशोधन करुन राज्य शासन हे धोरण निश्चित करेल, असे मुख्यमंत्र्यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले.

वर्सोवा बीच येथे स्वच्छतेसाठी अफरोज शाह यांनी हाती घेतलेले काम खूप मोठे आहे. काही कारणास्तव बंद पडलेली मोहीम अफरोज यांनी पुन्हा सुरु केली असून शासन पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्सोवा बीच येथे अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत आज मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याची सर्वांगीण स्वच्छता आणि संवर्धन यासंदर्भातील धोरण तयार करण्याबाबत अफरोज शाह हे काम करीत आहेत. या धोरणाचा मसुदा ते लवकरच राज्य शासनाला देणार असून त्यावर अजून संशोधन करुन राज्य शासन हे धोरण निश्चित करेल, असे यावेळी मुख्यमंत्र्यानी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई शहरातून दररोज साधारण 2100 एमएलडी सांडपाणी समुद्रात सोडले जाते. हे रोखण्यासाठी आपल्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लवकरच मुंबईत समुद्रात सोडले जाणारे सर्व सांडपाणी हे प्रक्रिया करुन सोडले जाईल. त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. प्लॅस्टिकमुळेही समुद्रकिनारे आणि समुद्राचे मोठे प्रदूषण होत आहे. प्लॅस्टीकवर निर्बंध आणण्याबाबत येत्या सहा महिन्यात कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत लोकांची मतेही जाणून घेण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अफरोज शाह यांनी सुरु केलेले सागरी किनारा स्वच्छतेचे काम खूप कौतुकास्पद आहे. काही जणांनी या कामाला विरोध केल्याने त्यांची स्वच्छता मोहीम बंद पडली होती. पण आपल्या आवाहनानंतर अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम पुन्हा सुरु केली आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच आज आपण येथे आलो आहोत. चांगले काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राज्य सरकार पूर्ण प्रोत्साहन आणि संरक्षण देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक यांना स्वच्छतेची, नद्या आणि समुद्राच्या संवर्धनाची तसेच निसर्गाच्या रक्षणाची शपथ दिली. यावेळी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, अफरोज शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा