महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
जलसंधारणाची राज्यातील लोकचळवळ देशात अभूतपुर्व - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, ०३ मार्च, २०१८
बातमी
भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या दुष्काळमुक्त मोहिमेचा शुभारंभ
जलसंधारणाचे पीपीपीपी मॉडेल राज्य दुष्काळमुक्त करणार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भुसूधार ते विपणनची साखळी
दुष्काळमुक्त मोहिमेमुळे जिल्ह्याची सामाजिक-आर्थिक प्रगती होणार
स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देऊन काम देणार

बुलडाणा :
शासनात आल्यानंतर अवघ्या एक महिन्यात जलयुक्त शिवारसारखे लोकसहभाग असणारे महत्वाकांक्षी अभियान राज्यात आणले. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राज्यात झाली. ही योजना केवळ शासनाची नसून ती जनतेची आहे, हे लोकसहभागावरून दिसून येते. यासोबतच राज्यात जलसंधारणाच्या कामांमध्ये खाजगी कंपन्या, संस्था यांचा सहभाग वाढत असून ही जलसंधारणाची लोकचळवळ देशात अभूतपूर्व अशी आहे. अशा कामांमुळे जलसंधारणात राज्य देशात निश्चितच अग्रेसर राहणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

भारतीय जैन संघटनांद्वारे दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत बुलडाणा जिल्हा सुजलाम् सुफलाम् मोहिमेचा शुभारंभीय कार्यक्रम मलकापूर रस्त्यावरील एआरडी मॉल समोरील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ परिवहन, जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, खासदार प्रतापराव जाधव, रावेरच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, राहूल बोंद्रे, डॉ.संजय रायमूलकर, डॉ.संजय कुटे, शशिकांत खेडेकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, भारतीये जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, माजी आमदार धृपदराव सावळे, विजयराज शिंदे, सुरेशदादा जैन, जेसीबी कंपनीचे कार्यकारी संचालक विपीन सौंढी, टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरूण जैन आदी उपस्थित होते.


राज्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या वर्षी काही हजार गावांमध्ये दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, या दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे कालांतराने शेतमाल उत्पादन कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर दूरगामी प्रतिकूल परिणाम होतो. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून शांतीलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे मोठे काम करीत आहे. खऱ्या समाजसेवी कामाचे दर्शन शांतीलाल मुथा यांच्या कामातून होते. राज्यभरात अशा कामांचा बुलडाणा पॅटर्न राबविण्यात यावा. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. त्यासाठी शासन जैन संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करेल. बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत जिल्ह्यातील जिगांवसह 8 लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हे अपूर्ण जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना राज्यात अंमलात आणण्यात येत आहे. या योजनेमुळे जलाशयांमधील गाळ काढून शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. परिणामी शेती सुपिक होत आहे. या कामांमध्ये स्थानिक जेसीबीधारकांना योग्य दर देऊन रोजगार मिळवून देण्यात येणार आहे.


जलसंधारणाच्या कामांचे पीपीपीपी (पब्लीक प्राईव्हेट पीपल पार्टनरशीप) मॉडेल राज्यात विकसित झाले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून संपूर्ण राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत खारपाणपट्टयातील गावांमध्ये शेतीचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये भूसुधारपासून विपणनापर्यंतची साखळी विकसित करण्यात येणार आहे. सदर प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दुष्काळमुक्त अभियानामुळे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडेल - नितीन गडकरी

कुठल्याही कामामागे प्रेरणा महत्वाची असते. या दुष्काळमुक्त अभियानाच्या कामांमागेही शांतीलाल मुथा यांची प्रेरणा महत्वाची आहे. सामाजिक संवदेनशीलता असल्यामुळे अशाप्रकारचे काम होत आहे. या कामांमुळे बुलडाणा जिल्ह्यातील संरक्षित सिंचनात भर पडणार आहे. परिणामी जिल्ह्याची सामाजिक-आर्थिक प्रगतीत भर पडणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.

परंपरागत पीक पद्धती सोडून शेतकऱ्यांनी नवनवीन पीक पद्धती अवलंबण्याचे आवाहन करीत केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, राज्यात पाण्याची कमी नाही. मात्र पाण्याचे नियोजन नसल्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. आंतरराज्यीय करार झाल्यामुळे अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहे. केंद्र पुरस्कृत बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पांतून विदर्भातील 78, मराठवाड्यातील 26 व प. महाराष्ट्रामधील 4 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 5000 कोटी रूपयांच्या रस्त्याची कामे सुरू असून 674 किलोमीटर लांबीचे रस्ते पूर्ण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या कामांमुळे सभोवतालची जलाशये गाळमुक्त करण्यात येत आहे. या जलाशयांमधील गाळ रस्ता कामासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.

श्री.गडकरी म्हणाले, शेतकऱ्यांनी इथेनॉल निर्मिती होणाऱ्या पिकांची लागवड करावी. मक्याच्या कणीसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यात येते. तसेच तांदुळ पिकाच्या काड्यांपासूनही बायो इंधनाची निर्मिती होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलवून नवीन पिकांची लागवड करावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बळीराजा जलसंजीवनी प्रकल्पातंर्गत जिगांवसह 8 लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यामुळे निश्चितच जिल्ह्याचे सिंचन वाढणार आहे.

याप्रसंगी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचा हा संकल्प स्पृहणीय आहे. अभियानात 134 जेसीबी मशीनच्या माध्यमातून जिल्हाभर गाळ काढण्याचे काम होणार आहे. यामुळे प्रकल्पांची जलसंचय क्षमता वाढून भूजल पातळीत वाढ होणार आहे. जिल्ह्यात रस्त्यांचा विकास जोमाने होत असून अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी मिळाला आहे.

यावेळी प्रास्ताविक शांतीलाल मुथा यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, जेसीबीमधील डिझेल खर्चाच्या 27 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता आहे. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी त्यांच्यावतीने या मोहिमेत मदत करणार आहे. याप्रसंगी टाटा ट्रस्टचे आशिष देशपांडे, वल्लभ भंसाली, मिशन समृद्धीचे अरूण जैन यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये करार करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी श्री. पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाचे छायाचित्र मुख्यमंत्री यांना भेट दिले. कार्यक्रमाचे संचलन राजेश देशलहरा यांनी तर आभार श्री. बांठीया यांनी मानले. कार्यक्रमाला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच, जैन समाज बांधव, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा