महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्य शासन अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी - डॉ. रणजीत पाटील गुरुवार, २० एप्रिल, २०१७
बातमी
अग्निशमन दलातील जवानांच्या प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यात अग्निशमन प्रबोधिनी

मुंबई :
अग्निशमन दलातील शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठिशी राज्य शासन भक्कमपणे उभे राहील. अग्निशमन दलातील जवानांच्या अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अग्निशमन प्रबोधिनी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालघर जिल्ह्यातील विराथन खुर्द येथे साडेबारा एकर जमीन दिली असून पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे दिली.

अग्निशमन सेवा सप्ताहाचा समारोप आणि अग्निशमन सेवा पदक प्रदान समारंभ डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते गेट - वे ऑफ इंडिया येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण, गृहरक्षक दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. एस. कुंदन, केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत अग्निशमन सल्लागार डी. के. शमी, महाराष्ट्र अग्निशमन सेवा दलाचे संचालक आणि मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, चित्रपट अभिनेते आणि देशातील अग्निशमन सेवेचे सदिच्छा दूत रणदीप हुड्डा या प्रसंगी उपस्थित होते.

अग्निशमन दलाचे जवान विविध आपत्तींमध्ये जीवाची बाजी लावून नागरिकांच्या जीवनाचे रक्षण करत असतात, असे गौरवोद्गार काढून डॉ. पाटील म्हणाले की, काही वेळा नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असले तरी काही काळजी घेतल्यास आग व अन्य कृत्रिम आपत्तींची तीव्रता कमी करता येऊ शकते. दुर्घटनेच्या ठिकाणी हे जवान अत्यंत जलदगतीने पोहोचतात व कमीत कमी हानी होईल याची दक्षता घेतात, असेही डॉ. पाटील म्हणाले.

ते म्हणाले की, अग्निशमन दलातर्फे इतर दलातील जवानांना फ्लड ॲण्ड रेस्क्यू प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातीलच खर्डी येथे पाच एकर जमीन दिली असून तेथे पूरग्रस्तांची सुटका करण्याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांना अग्नीशमन दलाची अत्याधुनिक मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, मुंबई अग्निशमन दलाचे जवान अत्यंत कार्यक्षम असल्याचा अनुभव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करताना घेतला आहे. अग्निशनम दलाला प्रगत करण्यासाठी ‘स्टेट ऑफ दी आर्ट’ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. दलाने सुरू केलेला अग्निसुरक्षा सप्ताह अत्यंत स्तुत्य उपक्रम असून दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रबोधन नागरिकांमध्ये केल्यास दुर्घटनांचे प्रमाण निश्चितच कमी करता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री. मिश्रा म्हणाले की, मुंबई अग्निशमन दल एक अत्याधुनिक आणि जलद प्रतिसाद देणारे दल असून मुंबई अग्निशमन सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी भारत सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय. एस. कुंदन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्री. रहांगदळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी 14 एप्रिल 1944 रोजीच्या मुंबईत झालेल्या फोर्ड स्टिकीन या बोटीच्या अपघातात हुतात्मे झालेल्या जवानांना 2 मिनीटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच माजी सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांनी अग्निशमन दलावर आधारित केलेली ध्वनीचित्रफीत त्याचबरोबर ‘दि सॅल्यूट टू रियल लाईफ हिरो’ या स्फूर्ती गीताच्या ध्वनीचित्रफीतीचे अनावरणही यावेळी करण्यात आले.

• 9 मे 2015 रोजी काळबादेवी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना राज्य शासनाने ‘शहीद’ दर्जा दिला आहे.
• काळबादेवी दुर्घटनेतील शहीद मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील हरिभाऊ नेसरीकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर गोपाळ अमिन, सहायक विभागीय अधिकारी संजय वामन राणे, स्थानक अधिकारी महेंद्र मधुसूदन देसाई या चार शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तसेच या दुर्घटनेत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या सहायक स्थानक अधिकारी अमोल दादासाहेब मुळीक आणि अग्निशामक (फायरमन) भूषण निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला.
• अग्निशमन सेवा सप्ताहामध्ये विविध ड्रीलमध्ये पहिले तीन क्रमां‍क मिळविलेल्या पथकांचा तसेच व्यक्तींचा सत्कारही करण्यात आला.
• सारिका चिमटे या युवतीने तीन प्रकारच्या ड्रीलमध्ये पहिला क्रमांक मिळविला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा