महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
अस्मिता ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना - मुख्यमंत्री गुरुवार, ०८ मार्च, २०१८
बातमी
स्वस्त सॅनिटरी पॅडसाठी अस्मिता योजनेचा शुभारंभ

मुंबई :
महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मोठा सामाजिक बदल होईल. तसेच मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमध्ये असलेला संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास आणि आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

ग्रामविकास विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या अस्मिता योजनेचा आज मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पदुम मंत्री महादेव जानकर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, महिला- बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, महिला-बालविकास सचिव विनीता सिंगल, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, येस बँकेच्या सिनिअर प्रेसिडेंट रिंकी ढिंगरा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अस्मिता योजनेची आखणी ही लक्ष्य निर्धारित (Targeted) आणि डिजिटल बेस केल्यामुळे एकही पात्र मुलगी सॅनिटरी पॅडपासून वंचित राहणार नाही. तसेच कोणीही या योजनेचा दुरुपयोग करु शकणार नाही. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात क्रांतिकारी ठरावी, अशी अस्मिता योजना ग्रामविकास विभागाने सुरू केली आहे. अभिनेते अक्षयकुमार यांनी आधी शौचालयासंदर्भात आणि आता मासिक पाळीसंदर्भात चित्रपट काढून मोठे सामाजिक योगदान दिले आहे. अक्षयकुमार यांनी जलयुक्त शिवारसाठीही ५१ लाख रुपयांचे योगदान दिले होते. ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये पॅडमॅन चित्रपट दाखवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. अस्मिता योजनेमुळे महिलांमधील मासिक पाळीसंदर्भातील संकोच कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अस्मिता योजनेच्या संकल्पनेपासून कार्यान्वयनापर्यंत मंत्री पंकजा मुंडे यांनी बारकाईने लक्ष दिले. राज्यातील महिलांना एक चांगली योजना दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे यांचे अभिनंदन केले. लोकांनी अस्मिता फंडसाठी मदत करुन जास्तीत जास्त मुलींसाठी अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.पंकजा मुंडे 'पॅडवूमन' - अक्षयकुमार
मंत्री पंकजा मुंडे यांनी फार आत्मियतेने अस्मितासारखी क्रांतिकारी योजना तयार केली. त्यामुळे त्यांना मी 'पॅडवूमन' म्हणून घोषित करतो, असे अक्षयकुमार यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, अस्मिता ॲपवर जाऊन लोकांनी अस्मिता फंडासाठी मदत केली पाहिजे. सुमारे सव्वाशे कोटी रुपये जमा झाले तरी आपण संपूर्ण महाराष्ट्राला १०० टक्के पॅडचा वापर करणारे राज्य बनवू शकतो. त्यामुळे सर्वांनी अस्मिता फंडासाठी सहयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी १० हजार मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

मंत्री महादेव जानकर यांनीही यावेळी ५१ मुलींची अस्मिता स्पॉन्सरशीप स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

अस्मितासारखी क्रांतिकारी योजना तयार करु शकलो याचा अभिमान - पंकजा मुंडे
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी अस्मितासारखी क्रांतिकारी योजना तयार करु शकलो, याचा मोठा अभिमान वाटत आहे. अस्मिता योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढेल, महिलांचे आरोग्य सुधारेल, बचतगटांच्या महिलांना रोजगार मिळेल. त्यामुळे ही योजना महिलांच्या आरोग्य रक्षणाबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणारी योजना आहे, असे त्या म्हणाल्या.

अक्षयकुमार यांना अस्मिता पुरस्कार
यावेळी अक्षयकुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अस्मिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जलतरणातील राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती, हाफ आयर्न लेडी चॅम्पियन रवीजा सिंघल यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अस्मिता गौरव पुरस्कार देण्यात आला.‘लोकराज्य’च्या महिला विशेषांकाचे प्रकाशन

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत निर्मित लोकराज्य मासिकाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि गुजराती भाषेतील महिला विशेषांकाचे यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या अंकात महिलांविषयीच्या शासनाच्या विविध योजना, महिलाविषयी कायदे, सुरक्षेचे विविध ॲप्स, यशकथा आदीविषयी माहिती देण्यात आली आहे. उमेद, सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना, अस्मिता योजना यासारख्या शासनाच्या योजनांवरील विशेष लेख आणि इतर उपयुक्त मजकुराचा अंकात समावेश आहे. ६० पृष्ठांच्या या अंकाची किंमत फक्त १० रुपये असून हा अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

प्रास्ताविक ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती अंबेकर यांनी केले. उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा