महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्यपाल-मुख्यमंत्री यांची प्रधानमंत्री माल्कम टर्नबूल यांच्याशी चर्चा बुधवार, १२ एप्रिल, २०१७
बातमी
समृद्धी महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुंबई :
महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सध्या भारतभेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री माल्कम टर्नबूल यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी श्री. टर्नबूल यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा विकास यासह अनेक विषयावर माहिती घेतली. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार आता 20 अब्ज डॉलर इतका आहे. तथापि, यापुढे तो अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील अनेक विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांत शिक्षण घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्री. टर्नबूल यांचे स्वागत करताना महाराष्ट्राची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येच्या चौपट असून 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेली युवक लोकसंख्या हे राज्याचे बलस्थान आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवणूक करण्यास मोठी संधी असून ऑस्ट्रेलियाने सेवानिवृत्त कोश राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवावा, अशीही विनंती राज्यपालांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना केली.

महाराष्ट्रात वीस विद्यापीठे असून तीन दशलक्ष विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात महाराष्ट्रातील विद्यापीठे व ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांना संशोधन, कौशल्य विकास व विद्यार्थी देवाणघेवाण या क्षेत्रात सहकाऱ्याची संधी असल्याचे त्यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितले.

मुंबई-नागपूर महामार्ग प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती

मुंबई-नागपूर महामार्ग हा 700 किमी लांबीचा महत्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला असून त्यासाठी 6 अब्ज डॉलर गुंतवणूक अपेक्षित आहे. या महामार्गामुळे राज्याचा 70 टक्के प्रदेश थेट जवाहरलाल नेहरू बंदराशी जोडला जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मुंबई शहरात देशातील सर्वात मोठा मेट्रो रेल्वे प्रकल्प तयार होत असून प्रस्तावित किनारपट्टी मार्गामुळे (कोस्टल रोड) रस्त्यावरील वाहतुकीचा ताण हलका होणार असल्याची माहितीही त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांना दिली. महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी क्रीडा क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा