महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
अन् मंत्रालय काही मिनिटांत रिकामे झाले...आपत्ती व्यवस्थापनासाठी रंगीत तालीम बुधवार, ११ ऑक्टोंबर, २०१७
बातमी
मुंबई : वेळ सकाळी 11.30 वा.ची... मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल, पोलीस व रुग्णवाहिका दलांना दूरध्वनी गेला आणि अवघ्या पाच मिनिटात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या मंत्रालयात दाखल झाल्या. याच दरम्यान मंत्रालयातील मुख्य इमारत व विस्तारित इमारत अवघ्या 14 मिनिटांत रिकामी करण्यात आली. निमित्त होते आपत्तकालीन परिस्थितीत काळजी घेण्यासाठी आयोजित रंगीत तालिमीचे (मॅाक ड्रील)....

मंत्रालयात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यानंतर कशा प्रकारे काळजी घ्यावी, यासाठी आज रंगीत तालिमीचे आयोजन करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीची माहिती इमारतीतील ध्वनिवर्धकावरून करण्यात आल्यानंतर प्रत्येक मजल्यावरून विहित पद्धतीने व विहित मार्गाने बाहेर पडण्याचे निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले होते. या निर्देशांचे पालन योग्य प्रकारे होते की नाही, यासाठी या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व मॉकड्रिलवर मंत्रालय नियंत्रण कक्षातून गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव व मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ या सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून होत्या.

सकाळी साडेअकरा वाजता सायरन वाजल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दलाला व 108 रुग्णवाहिकेला दूरध्वनी केला गेला. पाच मिनिट 40 सेकंदात अग्निशमन दलाची दोन गाड्या मंत्रालयात दाखल झाल्या. त्यानंतर तिसरी गाडी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या एकूण दोन पथक मंत्रालयात तातडीने दाखल झाली. 108 रुग्णवाहिका मंत्रालयातच उपस्थित असल्याचा संदेश मिळाला. त्याच वेळी संपूर्ण इमारतीत असलेल्या ध्वनीवर्धकावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आली. त्यानंतर एकाच वेळी दोन्ही इमारतीतील वरच्या मजल्यावरून ते खालच्या मजल्यापर्यंत अशा क्रमाने उपस्थित अधिकारी व कर्मचारी पायऱ्यांवरून खाली उतरले. 14 मिनिटांमध्ये दोन्ही इमारती संपूर्ण रिकामे झाल्याचे व त्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दिवे बंद असल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला.

यावेळी पाचव्या मजल्यावर असलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सुद्धा पाचव्या मजल्यावरून जीन्याने खाली आले. त्यांनीही या संपूर्ण तालिमीची पाहणी केली. या संपूर्ण कार्यवाही दरम्यान कुठलीही गडबड, गोंधळ न होता हा मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडले. इमारत रिकामी करताना करण्यात आलेले नियोजन हे मंत्रालय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी कधीही सज्ज असल्याचे दर्शविणारे ठरले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा