महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
मीरा भाईंदरच्या नियोजनबद्ध विकासाला अग्रक्रम देणार- मुख्यमंत्री सोमवार, १० जुलै, २०१७
बातमी
  • मीरा भाईंदरसाठी २१८ एमएलडी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

ठाणे : आजपर्यंत मुंबई परिसरातील महानगर क्षेत्राच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले पण आमच्या शासनाने या क्षेत्राला प्राधान्य द्यायचे धोरण ठेवले असून मुंबई बाहेर झपाट्याने विकसित होणाऱ्या मीरा भाईंदर शहराचा नियोजनबद्ध विकास हा माझा अग्रक्रम राहणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रादेशिक पुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.मीरा रोड येथील एस के स्टोन मैदान येथे हा कार्यक्रम पार पडला.

मुख्यमंत्री म्हणाले की, मीरा भाईंदरचा पाणी प्रश्न खूप जुना आहे. आणि त्यामुळेच आम्ही सत्तेवर आल्यानंतर विभागाची शिफारस नसताना देखील ७५ एमएलडी पाणी पुरविण्यास मान्यता देण्यात आली आणि सर्व लोकप्रतिनिधींनी त्याला पाठिंबा दिला. आत्ता देखील या २१८ एमएलडी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निविदा मान्य झाल्यानंतर मी भूमिपूजनाला येण्याचे मान्य केले, हे काम वेळेत पूर्ण केल्याबद्धल मी एमएमआरडीएचे अभिनंदन करतो. दोन महानगरपालिकांसाठी असलेली ही योजना काहीशी खर्चिक म्हणजे १३०० कोटींची असली तरी ९० कि.मी. अंतरावरून गुरुत्वाकर्षणाने हे पाणी आणण्यात येणार असल्याने विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचेल.

मेट्रोची कनेक्टीव्हिटी मुंबई तसेच महानगर क्षेत्रात सर्वदूर करण्यात येणार असून ठाण्यात कासारवडवली- गायमुखपर्यंत ती कशा पद्धतीने नेता येईल याची चाचपणी तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. गेल्या दोन वर्षात सर्वात जास्त निधी हा महानगर क्षेत्रात कुणाला दिला असेल तर तो मीरा भाईंदरला असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वसई खाडीवरील पूल, दहिसर भाईंदर जोड रस्ते, जैसल पार्क ते घोडबंदर, सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन हा रस्ता अशी विविध कामे डिसेंबरपर्यंत सुरु होतील. या शहराला एक चांगले स्टेडीयम असावे, या ठिकाणी एक कॉलेज असावे यासाठी देखील संबंधित विभागांशी चर्चा करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मीरा भाईंदर येथे स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व.प्रमोद महाजन यांच्या नावे आर्ट गॅलरी उभारण्यास राज्य शासन मदत करेल असे सांगितले.

मानीव अभिहस्तांतरण म्हणजेच डीम्ड कन्व्हेंअन्सचा विषय या शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असून त्यातही कायदेशीर बाबी तपासून मार्ग काढला जाईल तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाची योजना याठिकाणी कशी राबविता येईल याचा विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तहसील कार्यालय आणि पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याबाबतही त्यांनी सुतोवाच केले.

मीरा भाईंदर शहर हे पुढील वेळेस देशातील स्वच्छ शहरांच्या पहिल्या ५० नावांत असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहरीकरण हे आव्हान सकारात्मकरीत्या स्वीकारून उत्तम नियोजन असलेली शहरे असावी अशा योजना आणल्या आहेत. मीरा भाईंदरचा विकास एक चांगले, स्वच्छ, नियोजनबद्ध शहर म्हणून व्हावा असेही ते म्हणाले.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महापौर गीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे यांची भाषणेही झाली.

आज भूमिपूजन झालेल्या योजनेतून सूर्यानगर येथून झेड. पी. रोड, राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग-८ च्या बाजूने घोडबंदर जंक्शनपर्यंत ८८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील रहिवाशांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. शिवाय ४०३ एमएलडीपैकी २१८ एमएलडी पाणीपुरवठा मीरा-भार्इंदर महापालिकेला उपलब्ध होईल. या योजनेमध्ये सूर्या धरणाजवळ दोन उदंचन केंद्रे आणि सूर्यानगर येथे जलशुद्धिकरण केंद्र असणार आहेत.

या योजनेचा लाभ मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार परिसरातील २० लाखांहून अधिक रहिवाशांना होणार आहे. प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेला हा पहिलाच पाणीपुरवठा प्रकल्प आहे. ही योजना उभारण्यासाठी लार्सन अँड टूब्रोची नेमणूक करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु.पी.एस.मदान, उप महापौर प्रवीण पाटील, आयुक्त डॉ.नरेश गिते, विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचीही उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा