महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
केंद्र व राज्यांचे संबंध अधिक सुदृढ - हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समीट कार्यक्रमात मुख्यमंत्री शनिवार, ०६ ऑक्टोंबर, २०१८
बातमी
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यांचे संबंध आता अधिक सुदृढ झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रगती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे केंद्र व राज्यांमध्ये योग्य सुसंवाद निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समीट कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी उपस्थित होते. केंद्र व राज्य संबंध, जीएसटी, इंधन दरवाढ राज्यांचे विकास प्रकल्प आदी विषयांवर आयोजित चर्चासत्रात मुख्यमंत्र्यांनी आपले विचार मांडले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, केंद्र व राज्य यामधील संबंध आता अधिक सुदृढ झाले आहेत, राज्यांना आपल्या समस्यांविषयी आता केंद्राकडे जावे लागत नाही, कारण प्रधानमंत्र्यांनी प्रगती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुसंवाद घडवून आणला आहे. या प्रयत्नांमुळे अनेक राज्यांना विविध विकास कामांच्या परवानग्या सहज मिळू लागल्या आहेत. गेल्या चार वर्षात महाराष्ट्राला अनेक विकास प्रकल्पाचे मंजुरी आदेश केंद्राच्या प्रगती धोरणामुळे मिळालेले आहेत.

जीएसटीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पेट्रोल व डिझेलला जीएसटी अंतर्गत समाविष्ट करण्याचे महाराष्ट्र समर्थन करते, परंतु निव्वळ पारंपरिक व्यवस्थेवर अवलंबून न राहता आता पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. इथेनॉलचे धोरण हा भविष्यातला योग्य पर्याय आहे, यामुळे पुढील पाच वर्षात आपण 30 टक्क्यांपर्यंत आयात कमी करु शकतो. देशात अन्न-धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे जैव इंधन निर्मित करणे काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईचे शांघाय कधी होणार ? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे, मुंबई शहराची एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे मुंबईला कोणतेही दुसरे शहर न बनविता मुंबईच राहू द्यावी असे सांगून मुंबईचा विकास हे शासनाचे धोरण आहे. यासाठी आम्ही मेट्रो, मोनोरेल, सागरी मार्ग, जलमार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. गेल्या 60 वर्षांच्या तुलनेत मागील चार वर्षांत मुंबईत 1 लाख कोटींची विकास कामे सुरु करण्यात आलेली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या चर्चासत्राचे समन्वयन सीएनएन न्यूज 18 चॅनलचे उपकार्यकारी संपादक आनंद नरसिंहन यांनी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा