महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
दोन वर्षांत सांगली जिल्ह्यात सर्वांना घरे उपलब्ध करुन देऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार, १९ मे, २०१७
बातमी
चित्रफीत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • आगामी दोन वर्षात 15 हजार घरकुल बांधण्यासाठी नियोजन करा
  • महत्त्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा
  • जलयुक्त शिवार योजनेची प्रलंबित कामे 15 जूनपूर्वी पूर्ण करा
  • टेंभू उपसा सिंचन योजना राज्यात पथदर्शी करणार
  • स्वच्छ भारत अभियानामध्ये चांगले काम झाल्याबद्दल समाधान

सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 6 हजार 500 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. यातील 40 टक्के नागरिकांना निधीचा पहिला हप्ताही मिळाला आहे. बेसलाईन सर्व्हेप्रमाणे सांगली जिल्ह्यात अद्याप 15 हजार नागरिक बेघर आहेत. ही एक चांगली संधी मानून आगामी दोन वर्षात सर्वांना घरे उपलब्ध करुन देऊन सांगली जिल्हा बेघरमुक्त जिल्हा करण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मिरज येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शासनाच्या विकास योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. शाश्वत पाण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, प्रधानमंत्री आवास योजना या विकास योजनांची कामे मिशन मोडवर राबवा. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय चालणार नाही, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेत गाव विकास आराखड्यापासून अंमलबजावणीपर्यंत लोकसहभागाला प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवार योजनेमध्ये सांगली जिल्ह्याचे काम चांगले झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत सन 2016-17 मधील काम अपेक्षेप्रमाणे झाले नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी सन 2016-17 ची प्रलंबित कामे 15 जूनपूर्वी पूर्ण करावीत. तसेच सन 2017-18 चे नियोजन पावसाळ्यापूर्वी करावे. यासाठी संपूर्ण ताकद लावून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सूक्ष्म नियोजन करा व येत्या 3 ते 4 महिन्यात ते प्रत्यक्षात उतरवा, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी सध्या 165 मेगावॅट वीज लागते. या पार्श्वभूमीवर टेंभू योजना ही राज्यातील पहिली सौर ऊर्जा चलित उपसा सिंचन योजना करण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महाजनकोने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जागा आणि आराखडा या बाबींवर काम सुरू आहे. टेंभू योजनेचे पाणी आता कालव्याऐवजी बंद जलवाहिनीमधून देण्यात येणार आहे. या पद्धतीने टेंभू उपसा सिंचन योजना राज्यात पथदर्शी योजना (मॉडेल स्कीम) म्हणून करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

स्वच्छ भारत अभियानामध्ये शहरी आणि ग्रामीण भागामध्ये चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सांगली जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 70 हजार शौचालयपेक्षा अधिक शौचालय बांधणीचे काम झाले आहे. गेल्या 50 वर्षात होऊ न शकलेले हे काम प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केले आहे. हा एक प्रकारे विक्रमच आहे. प्रशासकीय यंत्रणेने मनावर घेतले तर किती चांगले काम होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. मात्र, स्वच्छतेमध्ये चांगले काम केलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकेने केवळ हागणदारीमुक्तीवरच न थांबता स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. घनकचरा विलगीकरण व व्यवस्थापन तसेच सांडपाणी व्यवस्थापन यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

पोलीस विभागाने डॉल्बीमुक्त गणेशोत्सव संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनेला केलेल्या मदतीच्या उपक्रमाबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले.

यावेळी आमदार सवश्री शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, अनिल बाबर, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जलयुक्त शिवार अभियान योजनेचे सादरीकरण केले. तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी स्वच्छ भारत अभियान शहरी भागाचे, प्रशासन अधिकारी पंकज पाटील यांनी स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भागाचे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी स्वच्छ भारत अभियानाचे आणि प्रधानमंत्री आवास योजनेचे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी पीक कर्ज योजनेचे, कार्यकारी अभियंता मिलिंद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी उपसा सिंचना योजनेचे सादरीकरण केले. लोकप्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा