महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
राज्यातील जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करावे - राज्यपाल सी. विद्यासागर राव मंगळवार, ११ जुलै, २०१७
बातमी
कृषी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई :
‘जलयुक्त शिवार अभियान’ सिंचनाची यशकथा ठरली आहे. शेतीला सिंचनाची व्यवस्था होण्यासाठी भविष्यात राज्यातील नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घ्यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.

येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात सन २०१४ चा कृषी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यावेळी उपस्थित होते.राज्यपाल म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांनी देशाच्या कृषी विकासात मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेल्या अभिनव प्रयोगांमुळे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसून येत आहे. कृषी विद्यापीठांपेक्षा शेतकऱ्यांनीच विविध प्रयोग आणि संशोधन करुन उत्पादनात वाढ केल्याचे दिसून येते. राज्याच्या कृषी क्षेत्रात महिला शेतकरीदेखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबरोबरच शेतीचीही जबाबदारी सांभाळताना दिसतात.

लहरी हवामान हे शेतीपुढील मोठे आव्हान असून, त्याला सामोरे जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबविले पाहिजेत. जेणेकरुन गारपीट, अवकाळी पाऊस, पूर या संकटांमुळे शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम कमी करणे शक्य होईल. फलोत्पादनामुळे महाराष्ट्र देशात अग्रेसर असून आंबा, द्राक्ष, केळी, डाळिंब आणि संत्रा यांच्या उत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. या निर्णयामुळे ८९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून ४० लाख शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. शाश्वत शेती, सेंद्रीय शेती, फलोत्पादन, फूल शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये महाराष्ट्राला आदर्श राज्य बनवूया, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.पुरस्कारार्थी शेतकरी राज्य शासनाचे ‘कृषिदूत’- मुख्यमंत्री

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुरस्कारार्थी शेतकरी हे राज्य शासनाचे ‘कृषिदूत’ आहेत. त्यांनी राज्यभर दौरे करुन शेतकऱ्यांना आपण केलेल्या प्रयोगांचे मार्गदर्शन करावे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनव प्रयोग राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास त्यांचा फायदा कृषी उत्पादन वाढीस होईल. या माध्यमातून आपणाला कर्जमाफीतून कर्जमुक्तीकडे वाटचाल करणे सुकर होईल. ज्या भागात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, तेथे पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषिदूताची भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यातील शेती क्षेत्रासमोर समस्यांचे आव्हान आहे. उत्पादन खर्च जास्त, त्या तुलनेत उत्पन्न कमी अशी स्थिती असताना नानाविध प्रयोगांच्या माध्यमातून शेतीचा विकास साधता येतो, असे पुरस्कारार्थी शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे शेतीच्या क्षेत्राला या माध्यमातून आशेचा किरण दाखविला आहे.

राज्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाने उपक्रम हाती घेतले आहेत. गेल्या २ वर्षात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करुन यावर्षी कृषी व कृषीसंलग्न क्षेत्रासाठी २५ हजार कोटींची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या काही महिन्यात वीजेच्या विक्रमी जोडण्या देण्यात आल्या. संरक्षित सिंचनाची उपलब्धता करुन दिल्यास शेतकऱ्यांना बहुविध पिके घेता येतील.

शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज देण्यासाठी पीक कर्जाची रचना केली गेली. राज्यात गेली ४ वर्षे शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळावे याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली असून कर्नाटक, पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांपेक्षा सर्वात मोठी कर्जमाफी महाराष्ट्राने जाहीर केली, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कर्ज घेऊन ते फेडण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण करणे म्हणजेच शेतकरी कर्जमुक्त झाला असे कर्जमुक्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना मुख्यमंत्री यांनी सांगितले. पुढील ३ वर्षात शेतीच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी भर देण्यात येणार असून सोलर फिडरच्या माध्यमातून कृषी पंपांना दिवसा १२ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रायोगिक तत्वावरील पहिला प्रकल्प राळेगणसिद्धी येथे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वीज, पाणी याची उपलब्धता करुन शेतीचे उत्पादन वाढवितानाच कृषी मालाला बाजाराशी जोडणे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे. शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. शेतकरी आणि बाजार यांच्यातील दलालांची साखळी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येत आहे. याबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे.अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

अमरनाथ येथील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरुंना तसेच निधन झालेल्या दोन कृषी पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याचा निषेध केला. निरपराध लोकांवर हल्ला करुन अतिरेकी केवळ एका देशाचे नाही तर मानवतेचे शत्रू ठरले आहेत. अतिरेकी कधीच जिंकू शकणार नाहीत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देणार- कृषिमंत्र्यांची घोषणा

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले की, मर्यादित साधन सामुग्रीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादन वाढीसाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. राज्यात उन्नत शेती, समृद्ध शेतकरीच्या माध्यमातून प्रथमच तालुका उत्पादकवाढीचा घटक म्हणून धरला जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादकता वाढीची उद्दिष्टे ठरविली जात आहेत.

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत २ वर्षासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख २० हजार २७६ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून ४२ हजार ३१८ कामे पूर्ण झाली आहेत. अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत १० हजार सौर कृषी पंपांची उभारणी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

पुरस्कारार्थी शेतकऱ्यांच्या प्रयोगांमुळे कृषी विकासाला चालना मिळाली आहे. पुरस्कारांमध्ये पुढील वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल अशी घोषणा कृषी मंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थी शेतकरी यांना धनादेश, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अमरनाथ येथे यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांचा औपचारिक स्वागत समारंभ रद्द करण्यात आला. यावेळी मृत यात्रेकरु व २ पुरस्कार विजेते शेतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

विविध पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे -

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार : विश्वासराव आनंदराव पाटील रु.७५०००/- रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र.

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार : ५०००० रुपये रोख , स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र

दिलीप नारकर, प्रेमानंद महाजन, आनंदराव गाडेकर, मच्चिंद्र कुंभार, आनंदराव मटकर, शेषराव निखाडे, दत्तात्रय गुंडावार

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार :
पुरस्कारार्थी महिलांना प्रत्येकी ५०००० रुपये रोख , स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- माधुरी भोईर, सुनीता रावताळे, वैशाली पवार, विद्या रुद्राक्ष, लक्ष्मीबाई पारवेकर

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार : पुरस्कारार्थींना रुपये ३०००० रोख, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- व्यंकट कुलकर्णी, चैताली नानोटे

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार : पुरस्कारार्थींना रुपये ११००० रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- सर्वसाधारण गट-राजेंद्र पाटील, देवेंद्र राऊत, चिंधा पाटील, हिम्मतराव माळी, अंजली घुले, बाळासाहेब काकडे, रमेश जाधव, दत्तात्रय पाटील, आनंदा पाटील, दत्तात्रय चव्हाण, शिवाजी बनकर, व्यंकटी गीते, शिवाजी कन्हेरे, धनंजय घोटाळे, रवींद्र मेटकर, सचिन सारडा, शालिग्राम चाफले, रियाज कन्नोजे, अविनाश कहाते आदिवासी गट- बाळकृष्ण पऱ्हाड, कल्पनाबाई बागुल, दिगंबर घुटे, मारोती डुकरे, झापू जामुणकर, वडू लेकामी

उद्यान पंडीत पुरस्कार : २५०००/- रुपये रोख,प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - प्रकाश ठाकूर, सुभाष गुंजाळ, रवींद्र पाटील, गणपत पारटे, भीमराव शेंडगे, दत्तात्रय फटांगरे, पुष्पा खुबाळकर, हिम्मतराव टप्पे

कृषी भूषण ( सेंद्रिय शेती ) पुरस्कार : रू.५००००/- रोख , स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - मधुकर मोहपे, नारायण चौधरी, नीता बांदल, प्रदीप निकम, बाळासाहेब जीवरख, नासरी चव्हाण, सुधाकर कुबडे, दिलीप कुलकर्णी, मानस रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार : राज्यातील कृषी विभागात काम करणाऱ्या आणि राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाची कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यास पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : विनय आवटे, प्रदीपकुमार अजमेरा, भागीनाथ गायके.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा