महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
८ जानेवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सोमवार, ०६ जानेवारी, २०२०
बातमी

संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनार्थ  

 

मुंबई : संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबतच्या ठरावास संमती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. दि. 8 जानेवारी रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन होणार आहे.

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबत ठराव, असे कामकाज होणार आहे. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सर्वश्री आशिष शेलार, अमिन पटेल, सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.

तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री हेमंत टकले, शरद रणपिसे, सुजितसिंह ठाकूर, जयंत पाटील, रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.

 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा