महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
३ लाखांहून अधिक दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा मंगळवार, ०९ एप्रिल, २०१९
बातमी
लोकसभा निवडणूक २०१९/विशेष वृत्त

मुंबई :
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ३ लाख ९ हजार २३३ दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकाधिक सुविधा देण्यात येणार आहेत.

राज्यात अंध/अल्पदृष्टी असलेले ५१ हजार ६०५ मतदार, मुकबधिर ३५ हजार ८८७ मतदार अस्थिव्यंग असलेले एकूण १ लाख ६१ हजार ९२० मतदार आणि अपंग म्हणून नावनोंदणी करण्यात आलेले ५९ हजार ८२१ मतदार आहेत.

अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप, व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली आहे. अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी EVM यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने 'सुलभ निवडणुका' म्हणजेच 'Accessible Elections' हे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे.

मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा

• मतदार मदत केंद्राची व्यवस्था
• मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा
• मतदारांच्या मार्गदर्शनासाठी माहिती फलक
• विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर ये-जा करण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा
• निवडक शाळांमध्ये विकलांग मतदारांसाठी सहाय्यकारी मतदान केंद्र
• अंध मतदारांसाठी ब्रेल भाषेमध्ये मतदार ओळखपत्र
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा