महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
रामटेक, कोराडी आणि सोनेगाव तलावाच्या पर्यटन विकास आराखड्यास तत्वत: मान्यता शुक्रवार, १४ जुलै, २०१७
बातमी
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

मुंबई
: नागपूर जिल्ह्यातील रामटेकचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कोराडीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा आणि सोनेगाव तलावाचा विकास आराखडा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार सुधाकर कोहळे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्राथमिक सोयी-सुविधांच्या निर्मितीस प्राधान्य द्या- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, कोणत्याही पर्यटनस्थळावर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटक तथा भाविकांसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा या प्राथमिक सुविधांची उभारणी करणे महत्वाचे आहे. नागपुरातील रामटेक, कोराडी आणि सोनेगाव तलाव याठिकाणी या प्राथमिक सोयी-सुविधांची प्राधान्याने उभारणी करण्यात यावी. तसेच या क्षेत्रांचे गतवैभव प्राप्त करण्याच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

श्री. बावनकुळे म्हणाले, या तिन्ही स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याच दृष्टीने या तिन्ही तीर्थस्थळे तथा पर्यटनस्थळांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार या स्थळांचा विकास करण्यात येईल.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा