महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
''मेक इन महाराष्ट्''चा जरीपटका फडकला सातासमुद्रापार ! गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
बातमी
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वीडनमध्ये यशस्वी आयोजन
मुंबई :
देशाला उद्योग क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ''मेक इन इंडिया'' आणि राज्याचे ''मेक इन महाराष्ट्र'' अभियान आज सातासमुद्रापार पोहोचले. देशाबाहेर प्रथमच स्वीडनमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मेक इन महाराष्ट्रचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मराठी उद्यमशीलतेचा जरीपटका स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये मोठ्या दिमाखात फडकला.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाच्या यशस्वी आयोजनानंतर प्रथमच अशा स्वरुपाचा मोठा उपक्रम घेण्यात आला. हॉल ऑफ मिरर्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, स्वीडनच्या युरोपियन युनियन व्यवहार आणि व्यापार मंत्री ॲन लिंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भारताच्या स्वीडनमधील राजदूत मनिका मोहता आदींसह उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मेक इन इंडिया नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील प्रगतीपर्वाबाबत उपस्थितांना माहिती दिली. मुंबई ही अर्थ-तंत्रज्ञान तर पुणे ही माहिती-तंत्रज्ञानाची राजधानी आणि नागपूर हे लॉजिस्टिक हब असल्याचे अभिमानाने सांगून मुख्यमंत्री म्हणाले, देशाची दहा टक्के लोकसंख्या सामावणाऱ्या महाराष्ट्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील वाटा 15 टक्के इतका आहे. सर्व प्रमुख जागतिक उद्योगांसह शंभरहून अधिक स्वीडीश उद्योगसमूह महाराष्ट्रात कार्यरत आहेत. पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महाराष्ट्र देशात अग्रेसर असून रस्ते, रेल्वे आणि बंदर विकास प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. त्यातील मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या सर्व पायाभूत सुविधांमुळे 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सचा टप्पा निश्चितच गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेली वीस वर्षे चीन हा जगाची फॅक्टरी म्हणून ओळखला जात असला तरी यापुढील काळात भारत हे जगाचे मॅन्युफॅक्चरींग हब म्हणून गौरविले जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, डेमोग्राफी, डेमोक्रॅसी आणि डिमांड यामुळे भारत जगात अग्रेसर असेल हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आशावाद लवकरच अस्तित्वात येईल आणि देशाच्या अग्रेसरत्वात महाराष्ट्राचा पुढाकार असेल. या उपक्रमाच्या आयोजनातून स्वीडन आणि भारत या दोन देशांमध्ये सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले असून भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम निश्चितच दृष्टीस पडतील. यावेळी उपस्थित उद्योजकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

‘संबंध’ स्वीडन आणि महाराष्ट्रामधील !
या कार्यक्रमात बोलताना स्वीडनच्या व्यापार मंत्री ॲन लिंडे यांनी संबंध या शब्दाबाबतचे अनोखे साम्य उलगडले. स्वीडीश आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये संबंध या शब्दाचा अर्थ समान असल्याचे स्पष्ट करून भविष्यात स्वीडन आणि महाराष्ट्र या दोन्हींमध्ये आम्ही अधिक ‘संबंध’ निर्माण होण्याबाबत आशादायी आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही श्रीमती लिंडे यांच्या या शब्दचातुर्याला दिलखुलास दाद दिली.

तत्पूर्वी, श्रीमती ॲन लिंडे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधातील विविध महत्त्वाच्या मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी विचारमंथन केले.

पुण्यातील प्रकल्प विस्तारण्याचा एसकेएफचा निर्णय
बेअरिंग आणि सील उत्पादन क्षेत्रातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या एसकेएफचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅलरिक डॅनियल्सन यांनी आज श्री फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. पुण्यात या समुहाचा निर्मिती प्रकल्प असून त्यांनी महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील आराखडा लवकरच निश्चित केला जाणार असून महाराष्ट्र सरकारसोबत अधिक सहकार्य वाढविण्याची तयारी त्यांनी या चर्चेत दर्शविली.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची पथदर्शी प्रकल्पाची तयारी
अ‍ॅस्ट्राझेनेका फार्मास्युटिकल्सच्या स्ट्रॅटेजी अँड कमर्शियल एक्सलन्स विभागाचे संचालक अतुल टंडन यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी जिल्हा रूग्णालयांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तयारी दर्शविली. या भेटीत श्री.टंडन यांनी मधुमेहासारख्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांच्या निदानात महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली.

‘इकियाने बांबूचा वापर वाढवावा’
इकिया या जगप्रसिद्ध फर्निचर निर्मात्या उद्योगाने आपल्या उत्पादनात बांबूचा वापर करण्यासह बांबूशी संबंधित उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या उद्योगाचे मुख्य नियंत्रण अधिकारी श्री.स्टेनमार्क यांच्याकडे केली. बांबूचा वापर वाढल्यास आदिवासींना रोजगार प्राप्त होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. महाराष्ट्र सरकारने बांबू विकास मंडळाची स्थापना केली असून स्थानिक पातळीवर आदिवासींना कौशल्य प्रशिक्षणही देण्यात येत आहे. इकिया उद्योगाने अशा प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रासाठी पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचविले. या उद्योगाने नवी मुंबई येथे आपल्या भव्य स्टोअरची उभारणी सुरु केली असून गेल्या मे महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचे भूमीपूजन केले होते.

रेसिफार्म एबी उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस एल्डर्ड यांनीही मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा केली. या भेटीत श्री.एल्डर्ड यांनी नागपूर लॉजिस्टिक हबसंदर्भात चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत माहिती दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा