महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
नागपूरची ‘माझी मेट्रो’ देशातील सर्वाधिक ‘ग्रीन मेट्रो’ ठरेल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवार, ०७ मार्च, २०१९
बातमी

माझी मेट्रो 21व्या शतकातील नागपूरची सुरुवात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूरच्या माझी मेट्रोचे उद्घाटन
प्रत्येक स्टेशनवर ऐतिहासिक वारसा झळकणार
एकाच मार्गावरुन 3 ते 4 स्तरावर असलेली वाहतूक व्यवस्था

नागपूर: मेट्रो रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार असून वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार आहे. अधिकाधिक सौरऊर्जा प्राप्त करुन देशातील अनेक मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत नागपूर मेट्रो ही अधिक ग्रीन मेट्रोअर्थात पर्यावरणपूरक मेट्रो ठरणार असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर 21व्या शतकातील नागपूरची सुरुवात माझी मेट्रोच्या रुपाने होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

वर्धा रोड येथील एअरपोर्ट साऊथ मेट्रो रेल्वे स्टेशन येथे नागपूरच्या माझी मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ.विकास महात्मे, आमदार प्रा.अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, प्रा.जोगेंद्र कवाडे, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओलिंकद्वारे कळ दाबून माझी मेट्रोचे उद्घाटन केले. तसेच माझी मेट्रोच्या खापरी ते सिताबर्डी या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी माझी मेट्रोच्या उभारणीसंदर्भातील कॉफी टेबल बुकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी माझी मेट्रो, ट्रान्सफॉर्मिंग नागपूर-ए ड्रीम कमींग ट्रूया प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.  

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करुन सर्वांची मने जिंकली. माझी मेट्रोच्या उद्घाटनानिमित्त श्री.मोदी यांनी नागपूरकरांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागपूर हे जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. देशातील मेट्रो असलेल्या शहरांमध्ये आता नागपूरचाही समावेश होत आहे. माझी मेट्रोचे काम दर्जेदारपणे व अतिशय वेगात पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वेसंदर्भात निश्चित धोरण ठरविण्यात आले असून मेट्रोचे नेटवर्क मागील चार वर्षात 650 कि.मी.ने वाढले आहे.देशाच्या इतर भागात
800 कि.मी. मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. माझी मेट्रोच्या रुपाने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीस चालना मिळाली असून यापुढेही जसजसा मेट्रोचा विस्तार होत जाईल तसतशी येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मेट्रोच्या विस्तारामुळे शहराचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. याबरोबरच आता वन नेशन वन कार्डही संकल्पना साकारण्यात येत असून या एका कार्ड अंतर्गत विविध परिवहन व्यवस्थेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. डिजिटल भारत अशी देशाची नवी ओळख तयार होत असून देशातील युवक विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करुन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असल्याचे श्री. मोदी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, माझी मेट्रोचे उद्घाटन हा नागपुकरांसाठी ऐतिहासिक व आनंदाचा क्षण आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विकसित व बळकट झाल्यास शहराच्या विकासाला हातभार लागतो. माझी मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. चांगल्या आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माझी मेट्रो हे प्रतिक ठरणार आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या मेट्रोमुळे उर्जेची बचत होईलच याबरोबरच कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे. माझी मेट्रोसाठी 65 टक्के ऊर्जा ही सौरऊर्जेतून प्राप्त होणार आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. परिवहनपूरक विकास ही संकल्पना आता महत्वाची ठरणार आहे.

माझी मेट्रो ही अन्य परिवहन व्यवस्थेला जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासामध्ये खर्च होणारा वेळ व शक्ती वाचणार आहे. मेट्रोच्या परिसरात विविध विकासात्मक कामेही हाती घेण्यात येणार आहेत. माझी मेट्रोची स्टेशन्स ही परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. यातून सेवाक्षेत्राद्वारे मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. माझी मेट्रो हा नागपूरचा नवा चेहरा, नवी ओळख ठरणार आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही लवकरच सुरु होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

श्री. गडकरी म्हणाले, अतिशय कमी वेळेत व दर्जेदार स्वरुपाचे काम माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांच्या समोर येत आहे. माझी मेट्रो ही अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. माझी मेट्रो सौरऊर्जा संपन्न तसेच स्टेशन्सची वैशिष्ट्यपूर्ण उभारणी यामुळे आगळी-वेगळी ठरणार आहे. शहरातील विविध बाजार परिसरांचा तसेच अन्य ठिकाणांचाही मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार असल्याने शहराच्या विकासासाठी हे लाभदायकच ठरणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोच्या रुपाने मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून ग्रामीण भागापर्यंत मेट्रो यापुढील काळात पोहोचेल. माझी मेट्रोमुळे नागपूरच्या पर्यटन विकासाला तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल व सीएनजीवर चालणाऱ्या बसेस यासारख्या माध्यमातूनही शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलत असल्याचेही श्री.गडकरी यांनी सांगितले.

श्री. मिश्र म्हणाले, नागपूरच्या माझी मेट्रोच्या रुपाने देशातील 18 वी मेट्रो साकारली जात आहे. या मेट्रो व्यवस्थेमुळे शहरातील परिवहन व्यवस्थेला गती मिळणार असून माझी मेट्रो सर्वांना परवडणारी ठरेल. माझी मेट्रो ही नागपूरची नवी ओळख ठरणार आहे.

माझी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले, माझी मेट्रोच्या रुपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत असून अनेक अर्थांनी ही मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सौर ऊर्जेने संपन्न असलेल्या या मेट्रोमुळे शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलणार आहे.

खापरी ते बर्डी टप्पा मेट्रोबाबत थोडक्यात

 • नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत सुरक्षितता, उपलब्धता, अनुकुलता आणि गतिच्या दृष्टीने अतिशय आदर्श व्यवस्था मेट्रोच्या रुपाने निर्माण झाली आहे.
 • अल्ट्रा-आधुनिक स्टेनलेस स्टीलचे कोचेस आणि वातानुकुलित सेवा
 • ट्रेनमध्ये एक कोच महिलांसाठी राखीव
 • दिव्यांगांसाठी जागतिक स्तरावरील सोयीसुविधा
 • प्रत्येक स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये पॅनिक बटन
 • डिजीटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म-5 डी बीआयएमच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापनात उत्तम कामगिरी
 • पिण्याचे पाणी आणि प्रसाधनाची सुसज्ज व्यवस्था
 • पहिल्या मैलापासून ते शेवटच्या मैलापर्यंत फिडर सर्व्हिसेस आणि मल्टी मॉडल इंटीग्रेशन
 • 100 टक्के सीसीटीव्ही कव्हरेज
 • 65 टक्के सौरऊर्जेचा वापर
 • कॉन्टॅक्टलेस कॉमन मोबिलीटी कार्ड (महाकार्ड)ची सुविधा
 • निर्मितीपासून 20 हजार लोकांना रोजगार मिळाला, पुढेही मिळत राहणार
 • प्रत्येक स्टेशनवर लिफ्ट आणि एक्सेलेटर
 • स्थानिक योगदान 70 टक्के देऊन मेक इन इंडियाचा उद्देश्य साध्य
 •  
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा