महान्यूज मुख्य बातमी
महान्यूज मुख्य बातमी
आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी नियोजन करा – मुख्यमंत्री शनिवार, १३ मे, २०१७
बातमी
उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक; फ्लॅगशीप योजनांतील कामांसाठीही सुनियोजनांचे निर्देश

उस्मानाबाद :
आगामी खरिपापूर्वी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, या पद्धतीने नियोजन करण्यात यावे. तसेच सरकारच्या प्राधान्यक्रमांवरील फ्लॅगशीप कार्यक्रमांतील कामे पावसाळ्यापूर्वी नियोजनपूर्वक पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या अंमलबजावणीची आढावा बैठक भूम येथील अल्लमप्रभू मंदिर परिसरातील यात्री निवासाच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा उस्मानाबादचे सहपालकमंत्री महादेव जानकर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार सर्वश्री सुजितसिंह ठाकूर, राहूल मोटे, मधुकरराव चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, राज्याचे अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, औरंगाबाद विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच विविध विभागांचे प्रमुख, अंमलबजावणी यंत्रणांतील अधिकारी आदींची उपस्थिती होती.

जिल्हा दौऱ्यातील विविध कामांचा आणि त्यातील लोकसहभागाचा आवर्जून उल्लेख करताना मुख्यमंत्री उपस्थित अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, कामांची पाहणी केली आणि ज्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी मोठे काम होताना दिसले आहे. वॅाटर कपच्या माध्यमातून एकाच वेळी साडेतीन हजार लोक श्रमदान करतानाचे आदर्श असे उदाहरणही दिसले. अशा रितीने लोक सहभाग घेत असल्यास, त्यांना सहकार्य करा, पुढाकार घ्या. स्वच्छ महाराष्ट्र, जलयुक्त शिवार अशा सरकारच्या प्राधान्यक्रमावरील फ्लॅगशीप कार्यक्रम, योजनांच्या अंमलबजावणीसाठी समन्वय ठेवा. त्यांचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करा. या कामांसाठी समरसून प्रयत्न करा. त्यामध्ये कल्पकता वापरा. आपला तालुका योजनांच्या अमंलबजावणीत क्रमांक एकवर राहावा, असा ध्यास असला पाहिजे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ते म्हणाले की, पावसाळ्यापूर्वीचा हा महत्त्वाचा कालावधी आहे. म्हणून एकावेळी दहा-बारा गोष्टींवर लक्ष पुरवून, कामे कशी पूर्ण होतील, असे प्रयत्न करावेत. आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. त्यांना हा पैसा आता मिळाला, तर त्यांना खरिपासाठी उपयुक्त ठरेल. कामांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असली पाहिजे. औपचारिकता म्हणून कामांचे परीक्षण, पडताळणी करू नका. निधीचा विनियोग योग्य रितीने व्हावे यासाठीची ही व्यवस्था आहे, हे ध्यानात घ्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत विविध विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियान-नागरी, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, पीक कर्ज पुनर्गठन, राष्ट्रीय दुग्धविकास प्रकल्प, बळीराजा चेतना अभियान, मुख्यमंत्री सडक योजना, तूर खरेदी आढावा अशा विषयांचा समावेश होता.

आढावा दरम्यान निर्देश देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जिल्हा बँका अडचणीत असतील, तर त्या ठिकाणी नागपूर जिल्हा बँकेचे मॅाडेल या जिल्ह्यातही राबवा. व्यापारी बँकांनी पैसे द्यावेत आणि जिल्हा बँकांनी मनुष्यबळ आणि सुविधा द्याव्यात. कर्ज वाटपासाठी मेळावे घ्या. यावर्षी सुनियोजितपणे कर्ज वाटपाचा आराखडा तयार करा. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करा. या पैशातून कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. याबाबत ठोस धोरण घेतले आहेत, निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही होईल, याची दक्षता घ्या. बळीराजा चेतना अभियानाच्या यशस्वीततेबाबत वस्तुनिष्ठ मूल्यमापनही करा. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीचा, त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात आलेल्या पडताळणीचा अहवालही सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावा. आवश्यक तेथे तूर खरेदीसाठी जादा काटे लावा आणि खरेदी वेळेत पूर्ण करण्यात यावी. आता सुरु असलेली तूर खरेदीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर, संबंधीत गैरव्यवहाराच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्यात यावी. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी निधी वापराबाबत यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाबाबत महावितरणने थकबाकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

यावेळी मुख्यमंत्री यांनी तालुकानिहाय विविध योजना, त्यातील कामांचा आढावाही घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत सहपालकमंत्री जानकर यांनीही सहभाग घेतला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनींधींही उस्मानाबाद जिल्ह्यातील योजनांची अमंलबजावणी, विकास कामांबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी श्री. गमे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रायते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे योजना, कामांबाबत माहिती दिली. कृषी, जलसंधारण, महसूल, कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांसह एनडीडीबीचे अधिकारी आदी बैठकीस उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा